कर्जत कल्याण राज्यमार्गावर भीषण अपघात; उपचारा दरम्यान पतीचा मृत्यू, तर पत्नी गंभीर जखमी
योगेश पांडे / वार्ताहर
रायगड – कर्जत कल्याण राज्यमार्गावर आयसर टेम्पो आणि मोटरसायकलमध्ये भीषण अपघातात घडला. यावेळी मोटरसायकलवरून प्रवास करणारे दाम्पत्य जबर जखमी झाले होते. मात्र, उपचार दरम्यान पतीचा मृत्यू झाला, तर पत्नी गंभीर जखमी झाली. एकनाथ बबन शेंडे असे मयत व्यक्तीचे नाव असून पत्नी जयश्री एकनाथ शेंडे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नेरळ जवळील बेकरे असलपाडा गावातील राहणारे हे दाम्पत्य मोटर सायकलवरून नेरळच्या दिशेने येत असताना मागून भरधाव येणाऱ्या आयसर टेम्पोच्या चाकाखाली येऊन हा अपघात घडला. घटनास्थळी नेरळ पोलिस हजर झाली असून टेम्पो चालक वाहन सोडून फरार झाला. ५२ वर्षीय एकनाथ बबन शेंडे आणि पत्नी जयश्री एकनाथ शेंडे हे दाम्पत्य बाजार खरेदीसाठी म्हणून आपल्या गावातून नेरळ येथे मोटरसायकलवर निघाले होते. एकीकडे पाऊस कोसळत असताना कर्जत दिशेकडून कल्याण दिशेने भरधाव निघालेल्या आयशर टेम्पो हा राज्यमार्गावरील टोकरे आंबिवली परिसरात दुपारी चार वाजण्याच्या सुमारास आला असता मोटरसायकलमध्ये अपघात घडला.
मोटरसायकल थेट टेम्पोच्या पुढच्या चाकाखाली जाऊन अडकली. अपघात एवढा भीषण होता की मोटरसायकल वरील दाम्पत्य रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर पडले होते. पतीच्या डोक्याला मार लागला होता. तर महिलेच्या नाकातून व डोक्यातून रक्त स्त्राव होवून रस्ता लालेलाल झाला होता. यावेळी नागरिकांच्या भीतीने टेम्पो चालक आपले वाहन सोडून घटनास्थळाहून फरार झाला. जखमींना स्थानिकांनी तात्काळ भिवपुरी येथील रायगड हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले. तेव्हा एकनाथ बबन शेंडे यांना उपस्थित डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. तर, पत्नी जयश्री एकनाथ शेंडे या जबर जखमी झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच नेरळ पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी आणि कर्मचारी दाखल झाले असून फरार टेम्पो चालकाचा शोध घेत आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली असून अशाप्रकारे एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.