हिंदी निर्णय रद्द, तरीही विजयी मेळावा ठरला; ५ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार – राज ठाकरे यांची घोषणा
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई – महाराष्ट्र सरकारने पहिली ते चौथीच्या वर्गात तिसरी भाषा म्हणून हिंदी सक्तीचा निर्णय अखेर मागे घेतला असला, तरीही ५ जुलैला ठरलेला विजयी मेळावा होणारच, अशी स्पष्ट घोषणा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज केली. या मेळाव्यामुळे तब्बल २० वर्षांनंतर ठाकरे बंधू म्हणजेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र दिसणार आहेत. राज्य सरकारच्या हिंदी सक्तीच्या निर्णयाविरोधात मनसे, ठाकरे गट आणि अन्य पक्षांनी एकत्र येत जोरदार विरोध केला होता. त्यामुळेच हा निर्णय मागे घेण्यात आला, असे राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेत सांगितले. “हा विषय क्रेडिटचा नव्हता, पण मराठीच्या संरक्षणासाठी आवाज उठवणं गरजेचं होतं,” असेही त्यांनी नमूद केले.
राज ठाकरे म्हणाले, “हिंदी ही राष्ट्रभाषा नाही, ती एका प्रांताची भाषा आहे आणि ती महाराष्ट्रावर लादली जाणं अशक्य आहे.” त्यांनी साहित्यिक, कलाकार, पत्रकार आणि जनतेचे विशेष आभार मानले. राज ठाकरे यांचं संजय राऊत यांच्याशी संवाद झाल्याचंही त्यांनी उघड केलं. दोघांमध्ये झालेल्या चर्चेनंतर मोर्चा रद्द करून ५ जुलैला विजयी मेळावा घेण्याचं ठरलं आहे. या मेळाव्याला कोणत्याही पक्षाचा झेंडा नसेल, असं राज ठाकरेंनी स्पष्ट केलं. ठिकाण अद्याप निश्चित झालेलं नसून, कार्यकर्त्यांशी सल्लामसलत करून लवकरच घोषणा केली जाईल, असंही त्यांनी सांगितलं.