“सरकारला सभागृहात बहुमत, पण रस्त्यावर सत्ता आमची” — उद्धव ठाकरे यांचा जनसुरक्षा विधेयकाला कडाडून विरोध

Spread the love

“सरकारला सभागृहात बहुमत, पण रस्त्यावर सत्ता आमची” — उद्धव ठाकरे यांचा जनसुरक्षा विधेयकाला कडाडून विरोध

पोलीस महानगर नेटवर्क

मुंबई : हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर सरकारला माघार घेण्यास भाग पाडणाऱ्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आता जनसुरक्षा विधेयकाविरोधात थेट मैदानात उतरण्याचा इशारा दिला आहे. मुंबईतील आझाद मैदानावर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने आयोजित केलेल्या जनसुरक्षा विधेयकविरोधी धरणे आंदोलनाला सोमवारी त्यांनी पाठिंबा दिला आणि या आंदोलनस्थळी भेट दिली.

उद्धव ठाकरे यांनी म्हटले, “सरकार जनसुरक्षा विधेयकाच्या माध्यमातून विरोधकांना नक्षलवादी ठरवून तुरुंगात डांबण्याचे स्वप्न पाहत आहे. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेकी हल्ला झाला, पण त्या घटनेतील अतिरेकी कुठे गेले? भाजपमध्ये गेले का? कारण भाजपमध्ये गेले की सर्वकाही माफ होतं. सभागृहात सरकारला बहुमत असलं तरी रस्त्यावर सत्ता आमची आहे.”

ठाकरे यांनी भाजपवर कडवट टीका करत म्हटले, “सत्तेच्या मस्तीने सरकार अघोषित आणीबाणी आणत आहे. तुम्ही म्हणता आणीबाणीचे दिवस वाईट होते, पण मागील दहा वर्षे अघोषित आणीबाणी चालू आहे. विरोधकांचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न जनसुरक्षा विधेयकाद्वारे केला जात आहे. याचा शिवसेना प्रखर विरोध करणार आहे. महाराष्ट्रात या विधेयकाविरोधात मोठा लढा उभारण्यात येईल.”

ते पुढे म्हणाले, “काल आपण सरकारला हिंदी सक्तीवर मोठा धक्का दिला. आम्ही हिंदी भाषेचे विरोधक नाही, पण तिची सक्ती सहन केली जाणार नाही. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जीआरची होळी करण्यात आली. आता जनसुरक्षा विधेयक आणून विरोधकांना नक्षलवादी ठरवले जाणार असेल, तर महाराष्ट्रात सरकारला पुन्हा गुडघ्यावर आणू.”

शेतकऱ्यांच्या समर्थनाचा उल्लेख:

ठाकरे यांनी २०१७-१८ साली नाशिकहून मुंबईकडे येणाऱ्या लाखो शेतकऱ्यांच्या मोर्चाची आठवण करून दिली. “तेव्हा त्यांच्या हातात लाल बावटा होता, पण त्यांच्या पायातून वाहणारे रक्त देखील लाल होते. त्याच्याशी माझी बांधिलकी आहे. त्यांनाही नक्षल ठरवण्याचे पाप भाजपने केले,” असा आरोपही त्यांनी केला.

भविष्याचा इशारा:

ठाकरे यांनी स्पष्ट इशारा दिला की, “सरकारने जर ही दडपशाही केली तर तुरुंग कमी पडतील. विरोधकांच्या आवाजाला गळा दाबण्याचा प्रयत्न सरकारने केला, तर महाराष्ट्रातील जनता त्याला सडेतोड उत्तर देईल. भाजपला मदांध हत्तीप्रमाणे वागताना महाराष्ट्र अंकुश लावल्याशिवाय राहणार नाही.” उद्धव ठाकरे यांनी सरकारवर तीव्र शब्दांत टीका करत जनसुरक्षा विधेयकाला लोकशाहीविरोधी ठरवले आहे. भाजप सरकारविरोधात एकजूट होण्याचे आवाहन त्यांनी सर्व पक्षांना व जनतेला केले असून महाराष्ट्रात रस्त्यावरचा संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon