डिजीटल अरेस्टची भीती दाखवून ६७ लाखांची फसवणूक; गुजरातच्या तीन सायबर ठगांना अटक
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई — डिजीटल अरेस्टची भीती दाखवत एअर इंडियामधून निवृत्त झालेल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याची तब्बल ६७ लाखांची फसवणूक केल्याच्या प्रकरणात गुजरातमधील बडोदा येथील तीन सायबर ठगांना मुंबई उत्तर सायबर पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे वेदांत नानकीदास महंत, मोहित हरेशभाई भुतैया, आणि भाविक जशभाई पटेल अशी आहेत.
फसवणुकीचा धक्कादायक प्रकार:
मालाड येथील रहिवासी असलेले तक्रारदार हे एअर इंडियामधून निवृत्त झालेले आहेत. डिसेंबर २०२३ मध्ये, एका अज्ञात व्यक्तीने त्यांना कॉल करून तो ट्रायचा कर्मचारी असल्याचे भासवले. त्याने तक्रारदाराच्या नावाने सिमकार्ड काढून, त्याचा वापर अन्य लोकांना त्रास देण्यासाठी केला. यामुळे दिल्लीमध्ये त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला गेला.
यानंतर दुसऱ्या एका व्यक्तीने सीबीआय अधिकारी असल्याचे भासवत, तक्रारदारावर मनी लॉन्ड्रिंग, ड्रग्ज तस्करी, मानव तस्करी यासारख्या गंभीर आरोपांचे खोटे प्रकरण उभे केल्याचे सांगून त्यांची चौकशी फोनवरून सुरू केली. त्यांना डिजीटल अरेस्टची धमकी देत, स्वतःचे नाव साफ करण्यासाठी बँक खात्यात पैसे ट्रान्स्फर करण्यास भाग पाडले. घाबरलेल्या तक्रारदाराने आपल्या एफडी व म्युच्युअल फंड मोडून सुमारे ६७ लाख रुपये ट्रान्स्फर केले.
तक्रारीनंतर पोलिसांची कारवाई:
घटनेनंतर तक्रारदाराने पत्नीला सांगितल्यावर फसवणुकीचा प्रकार समोर आला. त्यानंतर सायबर सेलमध्ये तक्रार दाखल करण्यात आली. पाच महिन्यांच्या तपासानंतर आरोपींना गुजरातमधून अटक करण्यात आली.
गुन्ह्यातील सहभाग स्पष्ट:
भाविक पटेल याने फसवणुकीसाठी खाजगी बँकेत खाते उघडले, जिथे ४.८० लाख रुपये जमा झाले. ही रक्कम वेदांत महंतकडे पोहोचवण्यात आली, तर मोहित भुतैया याने या व्यवहारात मध्यस्थी केली. तीघांना ३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून सखोल चौकशी सुरू आहे.