बाल हक्कांबाबत जनजागृतीसाठी मानखुर्द येथे ‘बालसभा’चे आयोजन
रवि निषाद / मुंबई
मुंबई – जनजागृती विद्यार्थी संघ या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मानखुर्द येथील चिकुवाडी परिसरात ‘बालसभा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. केंद्र सरकारच्या २०१४ च्या परिपत्रकानुसार बाल समित्या स्थापन करून स्थानिक मुलांचे संरक्षण, अधिकार आणि विकास यावर लक्ष केंद्रीत करण्याचा हेतू या कार्यक्रमामागे होता. या बालसभेत परिसरातील लोकप्रतिनिधी, अधिकारी, शिक्षक, समाजसेवक, पालक आणि स्वयंसेवी संस्थांचा सहभाग होता. बाल हक्क, संरक्षण, चाईल्ड सेफ्टी, कायदे आणि गेल्या काही वर्षातील कामाचा आढावा यावर यावेळी सखोल चर्चा झाली.
कार्यक्रमात महिला व बालविकास अधिकारी श्रीम. मीरा गुढीला, एकात्मिक बाल विकास प्रकल्पाच्या श्रीम. दिपाली देशमुख, माजी नगरसेविका श्रीम. समीक्षा सक्रे, मानखुर्द पोलिस ठाण्याच्या उपनिरीक्षक श्रीम. अश्विनी पाडले, ‘युवां’ संस्था प्रतिनिधी श्री. प्रकाश भवरे आणि ‘चाईल्ड लाईन’च्या श्रीम. शोभा यांनी बालसभेला मार्गदर्शन केले. सद्या मुंबई महापालिकेची निवडणूक प्रक्रिया सुरू नसल्याने बाल समितीच्या अध्यक्षपदी नव्याने निवडून येणाऱ्या नगरसेवकांची नियुक्ती होईल. तोपर्यंत माजी नगरसेविकांच्या मार्गदर्शनाखाली ही समिती कार्यरत राहील.
कार्यक्रमात श्री. संतोष सुर्वे (सेक्रेटरी, जनजागृती विद्यार्थी संघ) यांनी प्रभाग क्रमांक १३५ मधील बाल हक्कांच्या अंमलबजावणीविषयी चिंता व्यक्त केली. त्यांनी शाळा, दवाखाना, मैदान व सुरक्षित वातावरणाच्या अभावामुळे होणाऱ्या मूलभूत अधिकारांच्या हननावर लक्ष वेधले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. शाकीर बागवान यांनी केले. तर आयोजनात श्रुती चव्हाण, योगिता अहिरे, प्रतिक्षा सोलकर, आकाश कांबळे, गीता सुर्वे आदी स्वयंसेवकांचा मोलाचा सहभाग होता. १५ अंगणवाडी केंद्रातील सेविका, पालक वर्ग आणि स्थानिक मंडळांचे प्रतिनिधीही उपस्थित होते.