सभापती राम शिंदे यांच्या दौऱ्यात सुरक्षेमध्ये चूक; पोलिसावर कडक ॲक्शन, जागेवर निलंबित
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या २२ जून २०२५ रोजीच्या अहिल्यानगर शहरातील दौऱ्यादरम्यान गंभीर स्वरूपाच्या सुरक्षा आणि राजशिष्टाचाराबाबतच्या त्रुटी आढळून आल्याने कर्तव्यात कसूर केलेले पोलीस हवालदार भगवान रामदास वाघुले यांना पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांनी निलंबित केले आहे. अहिल्यानगर संलग्न जिल्हा विशेष शाखा, अहिल्यानगर परिक्षेत्राचे पोकॉ/२५८० भगवान रामदास वाघुले यांनी महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांच्या सावेडी, अहिल्यानगर येथील नियोजित दौऱ्यादरम्यान सुरक्षासेवेत कायदेशीर कर्तव्य पार न पाडल्याने आणि बेजबाबदार, बेशिस्त आणि हलगर्जीपणाचे वर्तन केल्याने शासन सेवेतून त्यांना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
कार्यक्रमाच्या ठिकाणी पुरेसा पोलिस बंदोबस्त न नेमल्याची तसेच स्थानिक पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी बंदोबस्तासाठी हजर नसल्याची बाब चौकशीअंती स्पष्ट झाली असता सदरील कसुरीबाबत चौकशी करण्यात आली. चौकशीअंती दोषी पोलिस पोकॉ/२५८० भगवान रामदास वाघुले यांच्या विरुद्ध शिस्तभंग विषयक कडक कारवाई आणि निलंबनाचे आदेश अहिल्यानगरचे पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिले आहेत.