महिला पोलीस विनयभंगवरुन महायुतीत जुंपली?
भाजप आमदाराला सहआरोपी करण्याची रविंद्र धंगेंकरांची मागणी
योगेश पांडे / वार्ताहर
पुणे – शनिवार वाड्याजवळ गर्दीचा फायदा घेत भाजप पदाधिकाऱ्याने महिला पोलीस अधिकाऱ्याचा विनयभंग केल्याची घटना समोर आली होती . या प्रकरणावरून आता महायुतीतच जुंपल्याचं पाहायला मिळतंय. महिला पोलीस विनयभंगावरून भाजप पदाधिकारी प्रमोद कोंढरे यांच्यासह भाजपचे आमदार हेमंत रासने यांना देखील सहआरोपी करा, अशी मागणी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत असलेल्या रवींद्र धंगेकरांनी केलीय. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी २३ जून रोजी पुण्यात येणार होते, त्यामुळे भाजप आमदार हेमंत रासने शनिवार वाडा परिसरात पक्ष पदाधिकाऱ्यांसोबत उपस्थित होते. मंत्री येण्यास उशीर होणार असल्याने आमदार रासने यांनी तिथे असलेल्या पदाधिकाऱ्यांना आणि पोलिसांनाही चहा घेण्यासाठी घेऊन गेले. तेवढ्यात भाजपचे पदाधिकारी प्रमोद कोंढरे हे भाजप कार्यकर्ते एका महिला पोलीस निरीक्षकाच्या मागे जाऊन उभे राहिले. या महिला अधिकाऱ्यांनी केलेल्या तक्रारीनुसार, कोंढरे यांनी दोन वेळा त्यांच्या शरीराला लज्जा निर्माण होईल असा स्पर्श केला.
महिला पोलीस निरीक्षकांनी त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेज मिळवलं आणि झालेला प्रकार पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या कानावर घातला. त्यानंतर प्रमोद कोंढरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, यावरून आता पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार रवींद्र धंगेकर आक्रमक झाले आहेत . आता भाजप पदाधिकारी प्रमोद कोंढरे यांच्यासह भाजपचे आमदार हेमंत रासने यांनाही महिला पोलिस विनयभंगाच्या प्रकरणात सहआरोपी करावे अशी मागणी शिंदेगटाच्या रविंद्र धंगेकर यांनी केलीय. त्यांच्या या मागणीमुळे महायुतीतच जुंपल्याचं चित्र पुन्हा निर्माण झालंय. हेमंत रासने त्या ठिकाणी होते. त्यावेळी त्यांनी कुठल्याही प्रकारचा जाब कोंढरेला विचारला नाही. परंतु ही महिला जेव्हा वरिष्ठ पोलिसांकडे तक्रार करायला गेली. तेव्हा हेमंत रासने त्यांच्यावर दबाव आणत होते. आणि केस मागे घेण्यास सांगत होते. कुठल्याही दबावाला ती बळी पडली नाही. महिलेचं खरतर कौतुक करायला हवं. त्या महिलेने पोलिसांचा मानसन्मान वाढवला. पोलिसांना माझी विनंती आहे की, हेमंत रासने सारख्या आमदाराला सहआरोपी करावं त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा. अशी मागणी शिंदेगटाचे नेते रविंद्र धंगेकर यांनी केलीय.