पुण्यात मेट्रोमोनियल साईटवरून महिलेला ३ कोटी ६० लाख रुपयांचा गंडा; इंटरनॅशनल महाठगाला पुणे सायबर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Spread the love

पुण्यात मेट्रोमोनियल साईटवरून महिलेला ३ कोटी ६० लाख रुपयांचा गंडा; इंटरनॅशनल महाठगाला पुणे सायबर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

योगेश पांडे / वार्ताहर 

पुणे – पुण्यात वाढत्या गुन्हेगारीच्या अनेक घटना उघडकीस येत असताना सायबर गुन्ह्यांमध्येही प्रचंड वाढ झाल्याचं दिसून येत आहे. पुण्यातील खराडी भागात राहणाऱ्या एका महिलेला शादी डॉट कॉम या मॅट्रिमोनिअल साईटवरून ३ कोटी ६० लाख रुपये रकमेला फसवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी एका आंतरराष्ट्रीय महाठगाला पुणे सायबर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीचं खरे नाव अभिषेक शुक्ला असून तो मूळचा लखनऊचा आहे. शादी डॉट कॉम या प्रसिद्ध मॅट्रिमोनिअर साईटवरून हे दोघे भेटले होते. फेक प्रोफाईल तयार करून या व्यक्तीनं महिलेस फसवल्याचं समोर आलं. ऑनलाईन विवाह जुळवणाऱ्या शादी डॉट कॉमच्या माध्यमातून ओळख वाढवून पुण्यात राहणाऱ्या एका महिलेला तब्बल ३ कोटी ६० लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय महाठगाला पुणे सायबर पोलिसांनी अटक केली आहे.

दिल्लीतील एक महिला पुण्यातील खराडी परिसरात वास्तव्याला असताना, तिची ऑनलाईन एका प्रोफाइलवरून ओळख ‘डॉ. रोहित ओबेरॉय’ या नावाने स्वतःला ऑस्ट्रेलियन नागरिक म्हणवणाऱ्या व्यक्तीशी झाली. ओळखीनंतर मैत्री, आणि नंतर लग्नाचं आमिष दाखवत आरोपीने महिलेशी जवळीक वाढवली. महिला आणि आरोपी यांनी काही काळ एकत्र वास्तव्यही केलं.

महिलेला तिच्या पहिल्या पतीकडून ५ कोटी रुपयांची पोटगी मिळालेली होती. ती आपल्या व्यवसायासाठी आर्थिक गुंतवणूक करत होती. ही माहिती मिळताच आरोपीने तिचा विश्वास संपादन करून तिचा व्यवसाय आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याचं आमिष दाखवलं. फसवणुकीचा बनाव रचत, आरोपीने इव्हॉन हॅन्दयानी आणि विन्सेंट कुआण या नावांची आडसावली वापरत सिंगापूर व भारतातील बँक खात्यांत वेळोवेळी रक्कम भरायला लावली. महिलेने एकूण ३ कोटी ६० लाख १८ हजार ५४० रुपये वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये भरले. काही महिन्यांनंतर आरोपीने बोलणं बंद केलं आणि नंतर त्याचा साथीदार ‘विन्सेंट’ याने मेल करून त्याच्या मृत्यूची बनावट माहिती दिली. यानंतर महिलेच्या लक्षात फसवणूक झाल्याचं आलं.

तांत्रिक विश्लेषणद्वारे पिडीताला फसवणाऱ्या व्यक्तीचे डॉ. रोहित ओबेरॉय खरे नाव नसून त्याचे अभिषेक शुक्ला नाव असून मूळ राहणार लखनऊ, सध्या राहणार पर्थ, ऑस्ट्रेलिया असे निष्पन्न झाले. तसेच आरोपी हा बाहेरील देशात असल्याची माहिती मिळाल्याने त्याचे नावाचे लुक आउट सर्क्युलर तात्काळ जारी केले असता, दि. २५/०६/२०२५ रोजी सदर आरोपी सिंगापूरवरून मुंबईला आल्याची खबर मिळताच मुंबई एअरपोर्टवर त्यास ताब्यात घेऊन गुन्ह्याच्या अनुषंगाने अटक केली असून सध्या आरोपी पोलीस कस्टडी रिमांडमध्ये आहे. पोलिस तपासात समोर आलं आहे की आरोपीने शादी डॉट कॉमवरून एकूण ३,१९४ महिलांना मेसेज करून संपर्क साधला होता. त्यामुळे आणखी किती महिलांची फसवणूक झाली आहे, याचा तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon