मुंबई पोलिसांची नशा विरोधी रॅली; आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त जनजागृतीची प्रभावी मोहीम
मुंबई – आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिनाचे औचित्य साधून मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाच्या वतीने भव्य नशा विरोधी रॅलीचे आयोजन करण्यात आले. ही रॅली सकाळी ११ वाजता मालाड (प.) येथील मुंबई पब्लिक स्कूल, मालवणी टाउनशिप येथून प्रारंभ झाली. ही जनजागृती रॅली युवकांमध्ये नशाविरोधी संदेश पोहोचवण्यासाठी आणि समाजाला ‘ड्रग्स मुक्त’ बनवण्याच्या दिशेने एक ठोस पाऊल म्हणून महत्त्वाची ठरली आहे.
🔹 रॅली आणि मोहिमेची वैशिष्ट्ये:
मुंबई पोलिसांनी गेल्या आठवड्याभरात शहरातील शाळा, महाविद्यालये, सार्वजनिक स्थळे, झोपडपट्ट्या आणि वसाहतींमध्ये जनजागृतीपर कार्यक्रम, शपथ विधी, चर्चासत्रे, आणि प्रबोधनात्मक उपक्रम राबवले. या मोहिमेत अमली पदार्थ विरोधी आणि स्थानिक पोलीस ठाण्यांचे विशेष योगदान राहिले.
मार्गदर्शक अधिकाऱ्यांचे नेतृत्व:
ही संपूर्ण मोहीम मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, संयुक्त पोलीस आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, अतिरिक्त पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बालकवडे आणि पोलीस उपायुक्त, (अमली पदार्थ विरोधी) नवनाथ धवळे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आली. विविध विभागांचे अतिरिक्त पोलीस आयुक्त, झोनल पोलीस उपायुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक व निर्भया पथक यांनी देखील सक्रिय सहभाग नोंदवला.
महत्त्वाचे यश:
मुंबई पोलिसांनी जानेवारी ते मे २०२५ या पाच महिन्यांत
🔸 १५० कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले
🔸 ३,००० हून अधिक आरोपींना अटक केली आहे.
हे आकडे शहरातील ड्रग्स विरोधी मोहिमेचे यश स्पष्टपणे अधोरेखित करतात.
समाजाला संदेश:
मुंबई पोलिसांनी सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, नशेपासून दूर राहा, आणि कोणत्याही प्रकारच्या अंमली पदार्थांच्या तस्करी अथवा सेवनाबाबत पोलिसांना तत्काळ माहिती द्या. “ड्रग्स मुक्त समाज” ही केवळ घोषणा नसून, ती एक जबाबदारी आहे, जी आपण सर्वांनी मिळून पेलावी लागेल,” असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले.
“एकत्र येऊया, आणि ड्रग्स मुक्त आमची मुंबई घडवूया!”