९५ हजारांची लाच घेताना पोलीस निरीक्षकांसह महिला पोलीस अटकेत; धाराशिव जिल्ह्यात खळबळ
योगेश पांडे / वार्ताहर
धाराशिव – राज्यात गेल्या काही महिन्यांपासून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईने जोर धरला असून अनेक बडे मासे जाळ्यात अडकत आहेत. विशेषत: महसूल खात्यात तहसिलदार, तलाठी ते ग्रामसेवकांपर्यंत अनेक अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत. आता, पोलीस खात्यातील अधिकाऱ्यावर एसीबीने कारवाई केली आहे. दोन लाख रुपयांच्या लाचेची मागणी करत ९५ हजार रुपये स्वीकारताना धाराशिव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व महिला पोलीस अंमलदार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली. याप्रकरणी आरोपींवर पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलीस ठाण्यात दाखल ३०६ अंतर्गत गुन्ह्यातील आरोपीला मदत करण्यासाठी पोलीस निरीक्षकांकडून लाचेची मागणी करण्यात आली होती, अशी प्राथमिक माहिती आहे.
२ लाख रुपयांच्या लाचेची मागणी करुन तडजोडी अंति ९५ हजार रुपये रक्कम घेण्याचे पोलिसांनी मान्य केले होते. मात्र, तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केल्यानंतर एसीबीने सापळा रचून ही कारवाई केली. त्यात, धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती शेळके व एका महिला अंमलदार लोखंडे यांना लाच लुचपत विभागाने ताब्यात घेतले असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आले आहे.