कामोठ्यात हिट ॲण्ड रनचा थरार; मद्यधुंद चालकाचा हैदोस, महिला गंभीर जखमी

Spread the love

कामोठ्यात हिट ॲण्ड रनचा थरार; मद्यधुंद चालकाचा हैदोस, महिला गंभीर जखमी

योगेश पांडे / वार्ताहर 

नवी मुंबई – नवी मुंबई कामोठे परिसरात रविवारी सायंकाळी एक धक्कादायक हिट अँड रनची घटना घडली आहे. मद्यधुंद अवस्थेत चालकाने भरधाव वेगात वाहन चालवत एका महिला पादचाऱ्याला जोरदार धडक दिली. धक्का दिल्यानंतरही चालकाने गाडी न थांबवता रस्त्यावरील आणि पार्किंगमधील वाहनांना धडकवत निघून जाण्याचा प्रयत्न केला. स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखत आरोपी चालकाला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. ही घटना रविवारी सायंकाळी सुमारे ६.३० च्या सुमारास घडली. कामोठे सेक्टर ६ ए येथील सरोवर हॉटेलसमोर एमएच ०२ बीजी ६७२३ क्रमांकाची सफेद स्विफ्ट कार एका महिलेवर आदळली. महिला रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगात आलेल्या गाडीने तिच्यावर जोरदार धडक दिली. या धडकेत त्या महिलेचा ताळतंत्र बिघडून ती थेट रस्त्यावर आदळली. तिच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली.

अपघातानंतर चालकाने थांबण्याऐवजी कार वेगात पुढे नेली आणि पुढील पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या तीन ते चार दुचाकी आणि दोन कारना धडक दिली. त्या आवाजामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. हा थरार पाहताच आसपासचे नागरिक तत्काळ मदतीला धावले. काहींनी कारचा पाठलाग करत पार्किंगच्या ठिकाणी चालकाला अडवले. यावेळी आरोपीचा संतुलन पूर्णपणे बिघडलेला होता. नागरिकांनी त्याला कारमधून खेचून बाहेर काढले आणि जोरदार चोप दिला. घटनेची माहिती मिळताच कामोठे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जमावाने आरोपी चालकाला पोलिसांच्या हवाली केले. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेत वैद्यकीय चाचणीसाठी एमजीएम रुग्णालयात नेले. प्राथमिक तपासात चालक मद्यधुंद असल्याचे स्पष्ट झाले आहे.या अपघातात जखमी झालेल्या महिलेवर पनवेलमधील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी तिची प्रकृती “स्थिर पण नाजूक” असल्याचे सांगितले आहे. तिच्या डोक्याला आणि उजव्या पायाला गंभीर इजा झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon