वारकऱ्यांच्या सेवेत कुसुमवत्सल्य फाउंडेशनचा अनोखा उपक्रम
अध्यक्षा वैशाली पाटील यांच्या पुढाकाराने २२० वारकऱ्यांना तेल मसाज व औषधोपचार सेवा
पुणे – संत तुकाराम व संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त, पुण्यातील कुसुमवत्सल्य फाउंडेशन ट्रस्ट या सेवाभावी संस्थेने एक आगळावेगळा व सामाजिक जाणिवा जागवणारा उपक्रम राबवला. या उपक्रमाअंतर्गत एकूण २२० वारकऱ्यांना आयुर्वेदिक तेल मसाज आणि मोफत वैद्यकीय उपचार देण्यात आले. या उपक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा सौ. वैशाली पाटील यांनी स्वतः वारकऱ्यांच्या पायांची सेवा केली. वारकऱ्यांच्या थकलेल्या पायांवर त्यांनी स्वतः तेल लावून मसाज केला आणि त्यांना मोफत औषधे देण्यात आली. त्यांच्या या सेवाभावी योगदानाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
राजू सांगळे, संतोष मळेकर, सुविधाताई नाईक आदी कार्यकर्त्यांनी सक्रीय सहभाग घेतला. तसेच विशेष सहकार्य महात्मा फुले मंडई शेतमाल व्यापारी संघटना पुणे अध्यक्ष राजेंद्रे कासुर्डे व जेष्ठ समाजसेवक अनिल रेडेकर यांचे लाभले. वारकऱ्यांसाठी जेवणाची व्यवस्था, फळवाटप, शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय आणि प्राथमिक वैद्यकीय सुविधा पुरवण्यात आल्या होत्या. वारकऱ्यांनी या सेवेला भरभरून प्रतिसाद दिला आणि “ही सेवा म्हणजेच खरी विठ्ठल भक्ती” अशा भावना व्यक्त करत फाउंडेशनच्या कार्याची मनःपूर्वक प्रशंसा केली. कुसुमवत्सल्य फाउंडेशन ट्रस्टने आपल्या सामाजिक बांधिलकीचे भान ठेवत एकप्रकारे सेवाभावाची नवी उंची गाठली आहे. भविष्यात असे उपक्रम नियमितपणे राबवण्याचा निर्धार संस्थेच्या अध्यक्षा सौ. वैशाली पाटील यांनी व्यक्त केला आहे.