विवाह संकेतस्थळावरून ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक: महिलेने ज्येष्ठ नागरिकाकडून ११.४५ लाख रुपये उकळले
पोलीस महानगर नेटवर्क
पुणे – विवाहाचे आमिष दाखवत एका सायबर ठग महिलेने ८५ वर्षीय निवृत्त नागरिकाची तब्बल ११ लाख ४५ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
फिर्यादी यांनी काही वर्षांपूर्वी पत्नीच्या निधनानंतर एकटेच जीवन जगत होते. यामुळे त्यांनी १८ एप्रिल रोजी एका ऑनलाईन विवाह संकेतस्थळाशी संपर्क साधून पुनर्विवाहासाठी नोंदणी केली. नोंदणीसाठी १५०० रुपये भरल्यानंतर त्यांना दुसऱ्या एका महिलेचा संपर्क क्रमांक देण्यात आला.
त्यानंतर संबंधित महिलेने भावनिक नात्याचा आधार घेत फिर्यादींशी जवळीक साधली. काही दिवसांतच तिने ‘मावसबहीण आजारी आहे’, ‘अपघात झाला आहे’, अशा बहाण्यांखाली वैद्यकीय उपचारासाठी पैशांची मागणी केली. पुण्यात आल्यावर सर्व पैसे परत करीन, असे सांगत तिने वेळोवेळी एकूण ११ लाख ४५ हजार रुपये घेतले. मात्र, तिच्या मागण्या थांबत नसल्यामुळे आणि ती सतत नवनवे बहाणे सांगत असल्यामुळे फसवणूक झाल्याची जाणीव फिर्यादींना झाली.
त्यानंतर त्यांनी तात्काळ सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली. प्राथमिक चौकशीनंतर ही केस बिबवेवाडी पोलिसांकडे सोपविण्यात आली. सध्या गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सूरज बेंद्रे या प्रकरणाचा तपास करत आहेत.
सतर्कतेचा इशारा:
या घटनेवरून वृद्ध नागरिकांसह सर्वांनी ऑनलाईन विवाह संकेतस्थळांचा वापर करताना सावधगिरी बाळगण्याची गरज अधोरेखित झाली आहे. ओळखीच्या व्यक्तीकडून आर्थिक मदत मागण्यात आल्यास ती नीट पडताळणे आणि अशा प्रकरणांमध्ये तात्काळ पोलिसांशी संपर्क साधणे गरजेचे आहे.