वारी सुरू असतानाच विठ्ठल-रखुमाई मंदिरात चोरी; अश्लाघ्य कृत्याने परिसरातून संताप
योगेश पांडे / वार्ताहर
नवी मुंबई – नवी मुंबईतील सीवूड्स परिसरात गणेश मैदानासमोर वसलेल्या श्री विठ्ठल-रखुमाई मंदिरात चोरीचा धक्कादायक प्रकार घडला आहे. सध्या पंढरपूरची वारी सुरू आहे. वारकरी माऊलीचं नामस्मरण करीत पंढरीच्या वाटेवर पुढे जात आहेत. अशात नवी मुंबईतून अत्यंत धक्कादायक बाब समोर आली आहे. अज्ञात चोरट्याने मध्यरात्री मंदिरात घुसून दानपेटी फोडून अंदाजे ३५००० ते ४०००० रक्कम लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एनआरआय सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास सुरू आहे. रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने मंदिराच्या मुख्य दरवाज्याचा कोयंडा तोडून कुलूप उघडले. त्यानंतर मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करून तेथे ठेवलेली दानपेटी फोडली. त्या दानपेटीत साधारणतः ३५ ते ४० हजार इतकी रक्कम होती, अशी माहिती फिर्यादीने दिली आहे. चोरटे रक्कम घेऊन पसार झाले. चोरीचा प्रकार सीसीटीव्ही किंवा अन्य पुराव्यांच्या आधारे उघडकीस आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
नवी मुंबई शहरातील मंदिरासारख्या पवित्र ठिकाणीही चोरट्यांचे हात पोहोचू लागल्याने नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. दानपेटीतील रक्कम ही धार्मिक श्रद्धेने दिलेली असते, अशा रकमांवर डल्ला मारणाऱ्या चोरट्यांविरोधात तातडीने कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिक करत आहेत. स्थानिक नागरिकांनीही परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षा रक्षक आणि योग्य प्रकाशयोजना यासाठी उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे. नवी मुंबई पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, लवकरच आरोपीच्या मुसक्या आवळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.