पोलीस भरतीच्या नावाखाली फसवणूक; बोरिवली पोलिसांकडून दोन आरोपी अटकेत
रवि निषाद /मुंबई
मुंबई – पोलीस भरती २०२१ मध्ये भरती करून देण्याचे आमिष दाखवून तब्बल ६,९९,५०० रुपये उकळल्याप्रकरणी बोरिवली पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणात वैभव रोहिदास तरे (वय ३४, रा. मालकरीपाडा, उंबरपाडा, सफाळे, जि. पालघर) यांनी तक्रार दाखल केली होती.
तक्रारीनुसार, रामसिंग बाळा डोलगे आणि हसमुख विनोदभाई वाघेला या दोघांनी पोलीस भरतीत भरती करून देण्याचे आमिष दाखवून तक्रारदाराकडून बँक खात्याद्वारे पैसे घेतले. भरती न करता ना पैसे परत केले, उलट दिलेले धनादेशही वटले नाहीत. त्यामुळे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. बोरिवली पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्र. ७०७/२०२४, भा.दं.वि कलम ३१८(४), ३(५) आणि माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६(ड) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी तपासास सहकार्य करत नसल्यामुळे परिमंडळ ११ चे पोलीस उपायुक्त यांच्याकडून अटकेसाठी परवानगी घेण्यात आली.
यानुसार, १२ जून २०२५ रोजी रामसिंग डोलगे (वय ५९, निवृत्त पोलिस कर्मचारी, रा. बीडीडी चाळ, नायगाव, दादर पूर्व, मुंबई) यास अटक करण्यात आली. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. आरोपीस मा. सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करून अटक करण्यात आली असून अटकेची माहिती त्याच्या मुलास, पंकज डोलगे यास दूरध्वनीद्वारे देण्यात आली. आरोपीस १६ जून २०२५ पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रामसिंग डोलगे याच्यावर यापूर्वीही विविध पोलीस ठाण्यांत फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. यामध्ये मीरा रोड पोलीस ठाणे – गु.र.क्र. १०६/2२०१६ – कलम ४२०, ४०३, कस्तुरबा मार्ग पोलीस ठाणे – गु.र.क्र. ९१५/२०२२, कलम ४२०, ३४ व मेघवाडी पोलीस ठाणे – गु.र.क्र. १७२/२०१७ ,कलम ४१७, ४२०, ४६५, ३४ यांचा समावेश आहे. या प्रकरणाचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.