“तू खूप छान दिसतेस” म्हणत संस्थाचालकाकडून महिला मॅनेजरचा विनयभंग; मनसेचे संताप, आंदोलन
पोलीस महानगर नेटवर्क
पुणे (बावधन) – पुण्यातील बावधन परिसरातील रामचंद्र इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट या संस्थेचे चेअरमन सूरज शर्मा याच्यावर संस्थेत कार्यरत असलेल्या महिला मॅनेजरने विनयभंगाची तक्रार दाखल केली आहे. बावधन पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून देखील शर्माला अटक झाली नाही, यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने संतप्त आंदोलन छेडले. तक्रारीनुसार, मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात शर्माने संबंधित महिलेला “तू खूप छान दिसतेस” असे म्हणत तिचा हात पकडून ओढल्याचा आरोप आहे. पीडित महिला ही संस्थेतच व्यवस्थापक पदावर कार्यरत असून, शर्मा तिच्यावर वेळोवेळी अश्लील टोमणे मारत होता, अशी माहिती दिली आहे.
या प्रकरणी बावधन पोलिसांनी गुन्हा नोंदवला असला तरी आरोपी अजूनही मोकाटच आहे. यामुळे आज मनसे विद्यार्थी सेनेकडून संस्थेच्या बाहेर जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी “मराठी महिलेवर अत्याचार करणाऱ्या परप्रांतीय सूरज शर्माला त्वरित अटक झालीच पाहिजे” अशी जोरदार मागणी केली. यावेळी पोलिस प्रशासनावरही कारवाईच्या दिरंगाईबाबत संताप व्यक्त करण्यात आला. या घटनेने पुण्यात पुन्हा एकदा कार्यस्थळी महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.