ठाण्यात टोईंग व्हॅन सेवेबाबत पोलिस आयुक्तांचे आश्वासन; अपेक्षित बदलांनंतरच अंमलबजावणी
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे – शहरात पुन्हा सुरू करण्यात आलेल्या टोईंग व्हॅन सेवेविरोधात नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. मागील सहा महिने बंद असलेली ही सेवा अचानक पुन्हा सुरू झाल्यानंतर वाहनचालकांच्या तक्रारींनी उग्र रूप धारण केले आहे. त्याच पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार संजय केळकर यांनी ठाणे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्याशी संपर्क साधून जनतेचा रोष पोहोचवला. आमदार केळकर यांनी स्पष्ट केले की, या सेवेबाबत नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर तक्रारी केल्या आहेत. दुचाकीस्वारांना नाहक त्रास, सेवेतील पारदर्शकतेचा अभाव, आणि पक्षपाती वागणूक यावर नागरिकांची विशेषतः नाराजी आहे. त्यामुळे त्यांनी आयुक्तांशी दूरध्वनीवर चर्चा करताना ठामपणे सांगितले की, “अपेक्षित सुधारणा केल्याशिवाय ही सेवा सुरू होऊ नये.”
या चर्चेनंतर आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी आश्वासन दिले की, “नागरिकांच्या तक्रारींची गंभीर दखल घेण्यात आली असून, त्यांच्या अपेक्षांनुसार बदल झाल्याशिवाय टोईंग सेवा सुरू केली जाणार नाही. या सेवेचे नियोजन अधिक शास्त्रशुद्ध व पारदर्शक पद्धतीने करण्यात येईल आणि तोपर्यंत ती अंमलात आणली जाणार नाही.” नगरसेवकांनी देखील याबाबत वाहतूक शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. या चर्चेच्या अनुषंगाने नागरिकांच्या भावना आणि समस्यांवर प्रकाश टाकत, आमदार केळकर यांनी पुन्हा एकदा प्रशासनावर दबाव आणला की जनतेच्या हिताविरुद्ध कोणतीही सेवा सक्तीने लादली जाणार नाही.
ठाणे शहरात टोईंग व्हॅन सेवा पुन्हा सुरू करण्याच्या निर्णयावर नागरिकांचा वाढता विरोध लक्षात घेता, पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी जनतेच्या अपेक्षित बदलानंतरच सेवा सुरू केली जाईल, असे आश्वासन दिले आहे. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील समन्वयामुळे जनतेच्या हिताचे निर्णय घेण्याकडे सकारात्मक पाऊल टाकले जाईल.