पहलगाम हल्ल्याचे नाव सांगून वृद्धाची ७० लाखांची फसवणूक; डिजिटल अटक प्रकरणाने खळबळ

Spread the love

पहलगाम हल्ल्याचे नाव सांगून वृद्धाची ७० लाखांची फसवणूक; डिजिटल अटक प्रकरणाने खळबळ

पोलीस महानगर नेटवर्क 

मुंबई – परेल परिसरातील एका ज्येष्ठ नागरिकाची तब्बल ₹७० लाखांची डिजिटल फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या चौकशीत आपले नाव आल्याचा खोटा दावा करून आरोपींनी ७५ वर्षीय निवृत्त वरिष्ठ अधिकारी आणि आदित्य बिर्ला ग्रुपचे माजी व्यवस्थापकीय संचालक यांना जाळ्यात ओढले.

२५ सप्टेंबर रोजी पीडितेला ‘एटीएस कंट्रोल रूम, दिल्ली’ अशी ओळख देणाऱ्या एका महिलेचा फोन आला. तिने त्यांचा आधार क्रमांक आणि मोबाईल नंबर दहशतवादी कारवायांत वापरल्याचा आरोप केला. त्यानंतर एका व्हिडिओ कॉलमध्ये ‘आयजी प्रेमकुमार गौतम’ असल्याचा दावा करणारा व्यक्ती आयपीएस गणवेशात समोर आला. त्याने अटक, बँक खाते जप्ती व पासपोर्ट ब्लॉक करण्याच्या धमक्या दिल्या.

दरम्यान, आरोपींनी पीडितेकडून वैयक्तिक व आर्थिक माहिती उघड करून घेतली. भीतीपोटी वृद्धाने आपल्या बँक खात्यांमधून सुमारे ₹७० लाख तिन्ही वेगवेगळ्या खात्यांमध्ये ट्रान्सफर केले. पैसे मिळाल्यानंतर आरोपींनी व्हॉट्सअॅपवर बनावट आरबीआय पावती पाठवली. शिवाय, मोबाईल व संगणक ‘निगराणीखाली ठेवले’ असल्याचे सांगत कोणाशीही संपर्क न करण्याचा दबाव टाकला.

२८ सप्टेंबरला आणखी ₹१ कोटींच्या मुदत ठेवीवर हात साफ करण्याचा प्रयत्न होताच पीडितेला फसवणुकीचा संशय आला. त्यांनी तत्काळ आरएके मार्ग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

सायबर गुन्हे विभागाने प्रकरणाला उच्च प्राधान्य देत तपास सुरू केला आहे. आरोपींचा माग काढण्यासाठी पोलिसांनी व्हॉट्सअॅप संदेश, ऑडिओ रेकॉर्डिंग आणि बँक खात्यांचे तपशील जप्त केले आहेत. या डिजिटल फसवणुकीमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon