पुण्याच्या रांजणगावमधील हत्याकांडाचं बीड कनेक्शन; आईसह दोन चिमुकल्यांची हत्या करणाऱ्या आरोपीला १० दिवसांनी बेड्या
योगेश पांडे / वार्ताहर
पुणे – जिल्ह्यातील रांजणगावमध्ये १० दिवसांपूर्वी आढळून आलेल्या तीन मृतदेहांचे गुढ उकलण्यात पोलिसांनी यश आलं आहे. एका २५ वर्षीय महिलेसह तिच्या लहान दोन मुलांचे मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली होती. मात्र, संबंधित महिला या परिसरातील कोणाच्याही परिचयाची नव्हती. त्यामुळे, पोलिसांना या घटनेचा तपास करण्यासाठी अधिक वेळ लागला. अखेर, १० दिवसांनी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या असून अनैतिक संबंधातूनच हे तिहेरी हत्याकांड घडल्याचं तपासातून समोर आलं आहे. संबंधित महिला बीड जिल्ह्यातील माजलगावची असल्याचे तपासातून निष्पन्न झालं आहे. याप्रकरणी पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांनी स्वतः गुन्ह्याच्या तपासासाठी विशेष ६ तपास पथकांची नेमणूक केली होती. राज्यभरातील ३३ पोलिस ठाण्यांतील अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा, आशा वर्कर्स, आरोग्य सेविका यांच्या मदतीने सुमारे १६,५०० भाडेकरूंना विचारपूस करुन आणि २५० सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण करुन पोलिसांनी हत्याकांडाचा तपास उलगडला.
जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील रांजणगावमध्ये २५ मे रोजी एक महिला आणि तिच्या अनुक्रमे एक आणि दोन वर्षांच्या मुलांचे मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळले होते. अनेक दिवस तपास करुनही पोलिसांना हत्या झालेल्या महिलेची ओळख पटवणे शक्य होत नव्हते. त्यानंतर पोलिसांनी संपूर्ण राज्यातील बेपत्ता महिलांची माहिती गोळा केली असता बीड जिल्ह्याची माजलगाव तालुक्यातील वाघोरे गावातील स्वाती केशव सोनवणे ही २५ वर्षांची महिला बेपत्ता असल्याच स्पष्ट झालं होतं. माजलगाव पोलिस ठाण्यातील महिला मिसिंग प्रकरणाशी ही माहिती जुळली. तिचे केशव सोनावणे याच्याबरोबर लग्न झाले होते. त्यांना स्वराज हा २ वर्षाचा तर विराज हा १ वर्षाचा मुलगा होता. पोलिसांनी या केशवची चौकशी केली. त्यात त्याने आपली आणि पत्नीची भांडणे असल्याचं सांगितलं. तसेच, ती आपल्या बरोबर राहात नसल्याचंही त्याने सांगितलं. ती आता आपल्या आई-वडिलांसोबत आळंदीत राहात असल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली. त्यानंतर तपासाची चक्रे फिरू लागली, अखेर १० दिवसांनी पोलिसांना आरोपीला बेड्या ठोकल्या. स्वातीचे तिच्या नवऱ्यासोबत पटत नव्हते. त्यातून तिचे गोरख बोखारेसोबत अनैतिक संबंध निर्माण झाले होते. त्यानंतर, ती गोरखकडे सातत्याने लग्नाची मागणी करत होती. त्यामुळे, या भागातून गोरखने स्वातीला घर सोडण्याच्या कारणाने गाडीवर बसवले आणि आळंदीहून रांजणगावला आणले. त्यानंतर, स्वातीच्याच ओढणीने तिचा गळा आवळून खून केला. तर, या नराधमाने तिच्या दोन लहान मुलांचीही हत्या केली. याप्रकरणी, पुण्यातील शिरुर पोलिसांनी अखेर आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.