भाजप आमदार रणधीर सावरकर आणि उबाठा गटाचे आमदार नितीन देशमुख यांच्यात वाद; अश्लील शिवीगाळ करत हाणामारीसाठी धावले
योगेश पांडे / वार्ताहर
अकोला – अकोल्याहून एक धक्कादायक बातमी आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत भाजप आमदार रणधीर सावरकर आणि ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांच्यात जोरदार वाद झाला. दलित वस्तीच्या प्रश्नावर हा वाद झाला. हा वाद इतका टोकाचा होता की त्यानंतर त्यांच्यात प्रचंड अश्लील शिवीगाळ झाली. अधिकारी आणि पालकमंत्र्यांनी दोघांना रोखल्यामुळे यावेळी हाणामारी टळली. जिल्हा नियोजन समितीची बैठक ही दलित वस्तीचा प्रश्न ठरला वादाचा केंद्रबिंदू ठरला.गुरुवारी पालकमंत्री आकाश फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली सुरू असलेल्या या बैठकीत अचानक वातावरण चिघळले. दलित वस्तीतील निधीच्या वाटपावरून भाजप आमदार रणधीर सावरकर आणि ठाकरे गटाचेआमदार नितीन देशमुख यांच्यात वाद सुरु झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, दोन्ही आमदार एकमेकांच्या दिशेने धावून गेले.
नियोजन भवनातील सभागृहातच हा प्रकार सुरु होता. त्यावेळी उपस्थित असलेले अधिकारी, पालकमंत्री आणि इतर आमदारांनी वेळीच हस्तक्षेप करून दोघांना वेगळं केलं. त्यामुळे मोठा अनर्थ टळला अन्यथा, शाब्दिक वादाचे रुपांतर हाणामारीत झाले असते अशी माहिती, घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही पदाधिकाऱ्यांनी दिली.