चर्चगेट स्थानकातील केकच्या दुकानाला भीषण आग; फायर ब्रिगेडकडून आगीवर नियंत्रण
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट रेल्वे स्थानकात गुरुवारी संध्याकाळी साडे पाचच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. आगीवर नियंत्रणात मिळवण्यात अग्निशमन दलाने लवकरच मिळवलं.सुदैवानं या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. एका केक शॉपमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यानं ही आग लागली. पश्चिम रेल्वेवरील प्रमुख स्थानक असलेल्या चर्चगेटच्या आवारात असलेल्या केक शॉपमध्ये आग लागली. संध्याकाळी साडे पाचच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे ही घटना घडली. हा परिसर बऱ्याबैकी बंदिस्त असल्यानं सगळीकडे धूर पसरला. रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या भुयारी मार्गातून धुराचे लोट मोठ्या प्रमाणात बाहेर पडू लागले. त्यामुळे भुयारी मार्ग प्रवाशांसाठी बंद करण्यात आला.
अग्निशमन दलाचे जवान, पोलीस त्वरित घटनास्थळी पोहोचले. आग लागलेल्या दुकानाच्या शेजारी बरीच दुकानं आहेत ती तातडीनं रिकामी करण्यात आली. परिसर मोकळा करण्यात आला. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग नियंत्रणात आणली. आग लागलेल्या दुकानात लाडकी फर्निचर असल्यानं आग काही मिनिटांत भडकली. चर्चगेट स्थानकात अनेक मोठमोठी आणि महत्त्वाची कार्यालयं आहेत. संध्याकाळच्या सुमारास कार्यालयातून चाकरमानी बाहेर पडतात. त्यामुळे संध्याकाळी चर्चगेट स्थानकात बरीच गर्दी असते. चर्चगेट स्थानकातूच विरारच्या दिशेनं जाणाऱ्या लोकल सुटतात. वर्दळीची वेळी चर्चगेट स्थानकात आग लागल्यानं प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. नोकरीचा दिवस भरुन घराकडे निघालेल्या कर्मचाऱ्यांची काहीशी गैरसोय झाली.