ट्रान्सफॉर्मवर दुरुस्तीचं काम सुरु असताना अचानक विद्युत प्रवाह झाल्याने विजेचा धक्का लागून २८ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू; परिसरात खळबळ
योगेश पांडे / वार्ताहर
विरार – महावितरणामार्फत ट्रान्सफॉर्मर दुरुस्तीचे काम सुरू असताना विजेचा धक्का लागल्याने भीषण दुर्घटना अर्नाळा परिसरात घडली आहे. महावितरणच्या चार कर्मचाऱ्यांना विजेचा धक्का लागला असून या दुर्घटनेत एका महावितरण कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे, तर तीन जण जखमी झाले आहे. जयेश घरत (२८) असे मृत महावितरण कर्मचाऱ्याचे नाव आहे. विरार पश्चिमेकडील अर्नाळा परिसरातील धसपाडा येथे ट्रान्सफॉर्मरमध्ये तांत्रिक बिघाड झाला. याबाबतची माहिती महावितरणला मिळाल्यानंतर महावितरणमार्फत या ट्रान्सफॉर्मरच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. दुरुस्तीसाठी महावितरणच्या वटार विभागाचे चार कर्मचारी या ट्रान्सफॉर्मवर चढले आणि दुरुस्ती काम करत होते.
मात्र, अचानक ट्रान्सफॉर्मरमधील विद्युत प्रवाह प्रवाहित झाल्याने या चारही कर्मचाऱ्यांना विजेचा जोरदार धक्का लागला. हा विजेचा धक्का इतका जोरदार होता की तीनजण खाली फेकले गेले तर जयेश घरत हा महावितरणचा कर्मचारी ट्रान्सफॉर्मरवरच अडकला आणि विजेचा जोरदार धक्का लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. शुक्रवारी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. महावितरणचे अन्य तीन कर्मचारी या दुर्घटनेत जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती विरार येथील स्थानिकांनी पोलिसांना दिल्यानंतर अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस, महावितरण अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मृत जयेश घरत याचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून याप्रकरणी अधिक तपास पोलीस करीत आहे.