अंबरनाथ येथील तीन झाडी परिसरात शिर नसलेला मृतदेह आढळल्याने खळबळ; पोलीस तातडीने घटनास्थळी, तपास सुरू
योगेश पांडे / वार्ताहर
अंबरनाथ – अंबरनाथ शहराच्या सीमेलगत असलेल्या नाळिंबी गावाच्या हद्दीतील तीन झाडी परिसरात एका व्यक्तीचा शीर नसलेला मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबतची माहिती मिळताच कल्याण ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. हा मृतदेह अंबरनाथच्या तीन झाडी परिसराच्या पुढे, रस्त्यापासून काही अंतरावर, कल्याण तालुक्यातील नाळिंबी गावाजवळ सापडला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून, ही हत्या पहाटेच्या सुमारास झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. तीन झाडी परिसर हा अंबरनाथच्या वेशीवर असलेला, निसर्गरम्य आणि गर्द झाडीने वेढलेला भाग असून, तो वन विभागाच्या अखत्यारित येतो.
अनेक नागरिक येथे फिरण्यासाठी किंवा निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येत असतात. याठिकाणी प्रेमी युगल, पर्यटक, तसेच कुटुंबांसह फिरणारे लोक मोठ्या संख्येने दिसतात. तसेच काही तरुण टोळक्यांचे मद्यपानाचे प्रकारही अनेकदा येथे निदर्शनास आले आहेत. या परिसराच्या पुढेच कल्याण तालुका सुरू होतो, जिथे नाळिंबी आणि वसत शेलवली ही दोन गावं लागतात. या भागात मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच कल्याण ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक जगदीश शिंदे आणि कल्याण ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुरेश कदम आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तात्काळ या प्रकरणी तपास सुरू केला आहे. इसमाची हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. या मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सध्या पोलिसांकडून सुरु आहे.