स्वतःवर बनावट फायरिंग झाल्याचा कट रचणाऱ्या शिवसेना शिंदे गटाचा नेता निलेश घारेला अटक
योगेश पांडे / वार्ताहर
पुणे – शिवसेना शिंदे गटाचा नेता निलेश घारे याला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या या अटकेने एकच खळबळ उडाली आहे. या निलेश घारेने एक भयंकर कट रचला होता. हे आता तपासात उघड झाले आहे. स्वतःवर बनावट फायरिंग प्रकरणी वारजे पोलिसांकडून निलेश घारेला अटक करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी त्याच्या कारवर फायरिंग झाली होती. त्यातून आपल्या जीवाला धोका असल्याचं त्याने पोलिसांना सांगितलं होतं. पण हा बनाव त्यानेच रचल्याचे आता समोर आले आहे. फायरिंग करणाऱ्या मुख्य आरोपीसोबत स्वतः निलेश घारे यांनी हा कट रचला होता. निलेश राजेंद्रे घारे हा शिवसेना युवासेनेचा जिल्हा प्रमुख आहे. तो शिवसेना शिंदे गटात कार्यरत आहे. १९ मेला रात्री १२ वाजता वारजे माळवाडी भागात घारे यांच्या वाहनावर अज्ञात व्यक्तींकडून गोळीबार करण्यात आला होता. वारजे पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. याबाबतची तक्रारही करण्यात आली होती. दुचाकीवरून आलेल्या दोन जणांनी घारे याच्या वाहनावर रात्री १२ वाजता गोळीबार केला होता. घारे हा आपले काम संपवून घराकडे निघाले होते. त्यावेळी ही घटना घडली. आपल्या जीवाला धोका असल्याचं त्याने पोलिसांना सांगितलं होतं.
मित्रांच्या सोबत माळवाडी येथील गणपती माथा येथील त्याच्या जनसंपर्क कार्यालयात तो आला होता. बाहेर पार्किंग केलेल्या काळ्या रंगाच्या गाडीवर काही तरुणांनी गोळीबार केला. सुदैवाने यात कोणी ही जखमी झालं नव्हते. त्यानंतर वारजे पोलिसांसह गुन्हे शाखेचे पथकं या प्रकरणाचा तपास करत होते. या प्रकरणी पोलिसांनी वारजे भागातून तीन जणांना ताब्यात घेतले होते. जिल्हाप्रमुख असलेल्या घारे यांने याआधी वारजे पोलिस ठाण्यात शस्त्र परवाना मिळावा यासाठी अर्ज केला होता. मात्र तो रद्द करण्यात आला होता. शस्त्र परवाना मिळावा तसेच, आपण जिल्हाध्यक्ष असल्याने पोलिस संरक्षण मिळावे यासाठी त्यानेच हा गोळीबार घडवून आणल्याचं आता स्पष्ट झालं आहे.