पत्नीशी वाद अन् थेट मुंबई विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी; पोलिसांकडून आरोपीला अटक
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – मुंबई नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने “आज दो बजे बॉम्ब ब्लास्ट होनेवाला है मुंबई एअरपोर्ट पर” अशाप्रकारे खोटी माहिती दिली. पोलिसांनी फोन करणाऱ्या व्यक्तीचा नंबर तात्काळ ट्रेस केला. तर हा फोन साकीनाक्यातून आला होता हे कळाले.अधिक तपासात पोलिसांना हा फोन साकीनाकातून मनजीत कुमार गौतम नावाच्या व्यक्तीने केल्याचे समोर आलेया प्रकरणी आझाद मैदान पोलिसांनी आरोपी विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका अधिकाऱ्याने या घटनेची माहिती देताना सांगितले की, मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ बॉम्बने उडवून टाकण्याची धमकी देणाऱ्या मनजीत कुमार गौतम याला ताब्यात घेण्यात आले आहे. अंधेरी पूर्व साकीनाका येथे राहणाऱ्या मनजीतने सांगितले की त्याचे बायकोशी भांडण झाले. त्यानंतर त्याने फेक कॉल करत मुंबई विमानतळ बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मनजीतने मंगळवारी सकाळी ९ वाजता मुंबई नियंत्रण कक्षाला फोन करत धमकी दिली की, विमानतळ दुपारी दोन वाजता बॉम्बने उडविले जाईल.धमकीचा फोन आल्यानंतर पोलिसांनी तात्काळ प्रकरणाचा तपास सुरू केला. वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबद्दलची माहिती दिली.पोलिसांनी केलेल्या तपासात धमकीचा फोन हा अंधेरीतूनच आल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर एमआयडीसी आणि सहार पोलिसांनी आरोपी मनजीतला अटक केली. अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपी पेशाने टेलर आहे. त्याला बीएनएस कलम १६८ अंतर्गत नोटीस बजावण्यात आली आहे. मनजीत गौतम याच्याविरोधात आझाद मैदान पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास आणि कारवाई करण्यात येत आहे.