तस्कराच्या करणाऱ्या इसमाच्या कल्याण रेल्वे पोलसांनी मुसक्या आवळल्या; लाखो रूपयांच्या ८ किलो गांजा जप्त
योगेश पांडे / वार्ताहर
कल्याण – कल्याण रेल्वे स्थानकात प्रवासी म्हणून आलेल्या एका संशयास्पद प्रवाशाची रेल्वे सुरक्षा बळाच्या जवानांनी सोमवारी तपासणी केली. त्यावेळी त्या प्रवाशाच्या जवळील पिवशीत आठ किलो वजनाचा लाखो रूपयांची गांजा सदृश्य अंमली पदार्थ आढळून आला. हा इसम गुजरातमधील रहिवासी आहे. या गांजाची बाजारातील किंमत लाखो रूपयांची आहे, असे रेल्वे सुरक्षा बळाच्या जवानांनी सांगितले. कल्याण रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक सातवरून लांब पल्ल्याच्या मेल, एक्सप्रेस सुटतात. या लांब पल्ल्याच्या गाड्यांमधून देशाच्या विविध भागातून प्रवासी येत असतात. त्यामुळे कल्याण रेल्वे स्थानकातील फलाट पाच ते सातवर सुरक्षा बळाचे पोलीस सतत तैनात असतात. सोमवारी दुपारी रेल्वे सुरक्षा बळाचे जवान नेहमीप्रमाणे कल्याण रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक सातवर तैनात होते. या फलाटावर एक इसम प्रवासी म्हणून फिरत असल्याचे दिसले. तो फलाटावर येणाऱ्या कोणत्याही मेल/एक्सप्रेसमध्ये चढत नव्हता.
हा प्रवासी कोठेही जात नाही. तो बराच उशीर फलाटावर रेंगाळत असल्याने लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बळाच्या जवानांना संशय आला. त्याच्याजवळ प्रवासी वाहतुकीची मोठी पिवशी होती. हा प्रवासी संशयास्पद वाटत असल्याने जवानांनी त्याच्यावर पाळत ठेवली. त्याची तपासणी करण्याचे जवानांनी ठरवले. एक जवान फलाट क्रमांक सातवर घुटमळणाऱ्या संशयास्पद प्रवाशाजवळ गेला. आपले नाव काय आहे. त्याने आपणास कुठे जायचे. आपण कुठून आला आहात, असे प्रश्न केले. त्यावेळी संबंधित संशयास्पद इसम गांगरला. तो पोलिसांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे देऊ शकला नाही. नरेशकुमार मनोहरभाई पंचोली (३४) असे नाव या इसमाने पोलिसांना सांगितले आणि आपण गुजरात येथील रहिवासी असल्याचे स्पष्ट केले. पोलिसांनी नरेशकुमार पंचोली या इसमाला ताब्यात घेतले. त्यांना रेल्वे सुरक्षा बळाच्या दालनात नेले. तेथे त्याची कसून चौकशी आणि तपासणी केली. त्यांच्या पिवशीत ८ किलो ३०० ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला. हा अंमली पदार्थांची तस्करी करणारा असल्याचे स्पष्ट झाल्यावर पोलिसांनी त्याच्या विरोधात अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याने गुन्हा नोंदवून अटक केली.
ही कारवाई लोहमार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस उपायुक्त मनोज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त अरूण पोखरकर यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरी कांदे, पोलीस निरीक्षक लक्ष्मण चव्हाण, उपनिरीक्षक प्रमोद जगताप, रेल्वे सुरक्षा बळाचे वरिष्ठ निरीक्षक गौरीशंकर एडले, सहाय्यक उपनिरीक्षक विजय पाटील आणि पथकाने केली.