भाजपचे माजी आमदार व मुंडेंचे निष्ठावंत आर.टी. जिजा देशमुख यांच्या गाडीला भीषण अपघात; अपघातात देशमुख कालवश
योगेश पांडे / वार्ताहर
लातूर – राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ वरील बेलकुंड उड्डाणपूल वरून जात असताना गाडी स्लिप होऊन सुरक्षा कठडा तोडून चारवेळेस पलटी झाल्याने भीषण अपघाताची घटना घडली. या अपघातात भाजपचे माजी आमदार आर.टी. देशमुख यांचे निधन झाले. अपघात एवढा भीषण होता की कारचा अक्षरश: चेंदामेंदा झाल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे, रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आर टी देशमुख हे बीड जिल्ह्यातील माजलगावचे माजी आमदार होते. लातूर तुळजापूर रस्त्यावरील बेलकुंड येथे त्यांच्या कारचा अपघात झाला. अपघातानंतर त्यांना तात्काळ लातूरच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं, पण त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेची माहिती मिळताच भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांनी तत्काळ आपले सर्व कार्यक्रम रद्द करत लातूरच्या दिशेने रवाना झाल्या. देशमुख हे २०१४ मध्ये भाजपच्या तिकीटावर माजलगावमधून आमदार बनले होते. परळी तालुक्याचे भूमिपुत्र व माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आर.टी. जिजा देशमुख यांच्या गाडीला सोमवारी दुपारी प्रवासादरम्यान लातूर-तुळजापूर -सोलापूर रस्त्यावरील बेलकुंड जि.धाराशिव गावाजवळ भीषण अपघात झाला. या आपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आर. टी. देशमुख हे दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांचे अत्यंत निकटचे विश्वासू सहकारी होते. वैद्यनाथ कारखान्यात सुरुवातीपासूनच ते संचालक म्हणून कार्यरत होते. त्याचबरोबर जिल्हा परिषद सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी तसेच भारतीय जनता पक्षाचे अनेक वर्ष जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांची उल्लेखनीय कारकीर्द ठरलेली आहे.
दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्यानंतर पंकजा मुंडे यांच्या पाठीशी खंबीर उभे राहत त्यांनी आजतागायत पंकजा मुंडे यांच्यासाठीच पक्षात काम केले. माजलगाव मतदार संघातून त्यांना विधानसभेची उमेदवारी देण्यात आली होती. या निवडणुकीत अतिशय अटीतटीच्या वातावरणात त्यांनी ही निवडणूक जिंकली होती. ५ वर्षे त्यांनी माजलगाव मतदारसंघाचे लोकप्रतिनिधित्व केले. अतिशय सोज्वळ, सुसंस्कारी, संयमी आणि खंबीर नेता अशी त्यांची कायमच प्रतिमा परळीसह बीड जिल्ह्यात राहिलेली आहे. लातूर -तुळजापूर-सोलापूर मार्गावरील बेलकुंडजवळ त्यांच्या गाडीला आज भीषण अपघात झाला, हा अपघात इतका भयानक होता की गाडीचा चेंदामेंदा झाल्याचं फोटोत पाहायला मिळत आहे. दरम्यान, अपघातानंतर गंभीर जखमी अवस्थेत जीजा यांना लातूर येथील सह्याद्री रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, दाखल करण्यापूर्वीच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे सह्याद्री हॉस्पिटलच्या वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. आर टी देशमुख यांच्या निधनाबद्दल सर्व स्तरातून शोक संवेदना व्यक्त केली जात आहे. दरम्यान, राज्याच्या पर्यावरण तथा पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत नांदेड येथील कार्यक्रमात असतानाच त्यांना ही माहिती कळाली. त्यानंतर तातडीने त्यांनी आपले सर्व कार्यक्रम रद्द करत नांदेडहून लातूरकडे प्रस्थान केले. आर टी देशमुख यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधत त्यांनी धीर दिला. तसेच सह्याद्री हॉस्पिटलच्या डॉ. किनीकर यांच्याशीही संवाद साधून माहिती घेतली.