पुण्यातील दौंडमध्ये राज्यातील पावसाचा पहिला बळी; जुन्या बांधकामाची भिंत कोसळून ७५ वर्षीय महिलेचा मृत्यू
योगेश पांडे / वार्ताहर
पुणे – राज्यात मान्सूनने पहिल्याच दिवशी रेकॉर्डब्रेक एन्ट्री घेतली असून अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्टयामुळे महाराष्ट्राच्या बहुतांश भागात तुफान पाऊस सुरु झाला आहे. अनेक भागात पूरपरिस्थिती निर्माण झालीय. पुण्यात पावसाची झड कायम आहे. दरम्यान, आता पावसाने राज्यातील पहिला बळी गेल्याची माहिती समोर येत आहे. पुण्यातील दौंड तालुतक्यात झालेल्या मुसळधार पावसाने दुकानात बसलेल्या ७५ वर्षांच्या महिलेच्या अंगावर जून्या बांधकामाची भिंत कोसळून जागीच मृत्यू झाला. रविवारी रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसामुळे पुण्यात अनेक ठिकाणी मोठी पडझड होत आहे. रस्ते पाण्याखाली गेले आहेत. जनजीवन विस्कळीत झाले आहे. दौंड शहरात दुकानात बसलेल्या ताराबाई विश्वचंद्र आहिर या ७५ वर्षीय महिलेच्या अंगावर जुन्या बांधकामाची भिंत कोसळल्याने वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. राज्यात पावसाची सुरुवात होताच दौंड शहरात पहिलाच बळी गेला असून, जुन्या बांधकामाची भिंत कोसळून एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे. ताराबाई विश्वचंद आहिर (७५) असे मृत महिलेचे नाव आहे. त्या दौंड शहरातील एका दुकानात बसलेल्या असताना, अचानक भिंत कोसळली आणि त्यांच्या अंगावर पडली. या घटनेत त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सदर भिंत जुन्या बांधकामाची होती. अचानक झालेल्या पावसामुळे ही दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनास्थळी दौंडचे तहसीलदार अरुण शेलार यांनी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.