पावसाने बस स्थानकाच्या छताचा भाग कोसळून मोठा अपघात, शिवशाही बसेससह अनेक वाहनांचे नुकसान
योगेश पांडे / वार्ताहर
सिन्नर – राज्यात पावसाचा धुमाकुळ सुरु असून नाशिकच्या सिन्नर बस स्थानकात मोठी दुर्घटना घडली आहे. येथील एसटी महामंडळाच्या बसस्थानकाचे छत कोसळून मोठा अपघात घडला आहे. पावसाचा मारा सुरु असल्याने या स्थानकाच्या छताचा काही भाग अचानक कोसळून शिवशाही बसेसचे मोठे नुकसान झाले आहे. या भागातील जोरदार पाऊस कोसळत असल्याने हे छत कोसळल्याचे म्हटले जात आहे. या अपघातात शिवशाही बसेस सह एका कारचाही चुराडा झाला आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणती मनुष्यहानी झालेली नाही. शिवशाही बसेसमध्ये प्रवासी असताना हा स्लॅब कोसळ्याचे म्हटले जात आहे. या अपघातग्रस्त बसेसमधील प्रवाशांना आपात्कालिन मार्गातून बाहेर काढण्यात यश मिळाले आहे. दरम्यान, बारामती आणि औंध येथे ढगफूटी सदृश्य पाऊस झाल्याने येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
महाराष्ट्रात मान्सून सक्रीय झाला असून येत्या दोन दिवसात जोरदार पर्जन्यवृष्टी होण्याचा इशारा पुणे वेध शाळेने दिला आहे. पुणे,सातारा जिल्ह्यात मोठा पाऊस झाला असून आणखी पर्जन्यवृष्टी होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.जोरदार पावसाने पुणे- सोलापूर महामार्गावर औंध तालुक्याच अचानक ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने पाण्याचा पुर आला आहे.