सासरच्या जाचाला कंटाळून ‘भक्ती’नं संपवलं जीवन, पती अन् सासऱ्याला नाशिक पोलिसांनी गुजरातमधून आवळल्या मुसक्या
योगेश पांडे / वार्ताहर
नाशिक – पुणे येथील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण ताजे असताना नाशिकमधील उच्चभ्रू वस्ती असलेल्या गंगापूर येथे ३७ वर्षीय विवाहित महिला भक्ती अथर्व गुजराथी हिने आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची तक्रार मृत महिलेच्या नातेवाईकांनी केली होती. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात सासरच्या लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तर या प्रकरणी कालच भाजप आमदार चित्रा वाघ यांनी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची भेट घेतली आहे. आता भक्ती गुजराथीचा पती आणि सासऱ्याला गुजरातमधून नाशिक पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. भक्ती अथर्व गुजराथी यांचे वडील दिलीप प्रभाकर माडीवाले हे व्यवसायाने सराफी असून आपल्या मुलीने आत्महत्या केली, असे कळताच त्यांनी नाशिक येथे येऊन तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार गंगापूर पोलीस स्टेशन येथे दाखल केली. मृत भक्ती अथर्व गुजराथी आणि पती अथर्व गुजराथी यांचा सात वर्षांपूर्वी विवाह झाला होता. त्यांना पाच वर्षाचा मुलगा देखील आहे. भक्ती आणि अथर्व यांचं प्रेमविवाह होता.
त्यांच्या विवाहाला भक्तीच्या आई-वडिलांचा नकार होता तरी देखील त्यांनी भक्तीचे अथर्व गुजराथी यांच्यासोबत लग्न लावून दिले. प्रेमविवाह असल्यामुळे भक्ती सासरच्यांकडून होणारा त्रास, पतीकडून शारीरिक आणि मानसिक छळ कोणालाही न सांगता सहन करत होती. मात्र तिने वारंवार होणारा त्रासाला कंटाळून तिचे आई वडील आणि भावाला याबाबत सांगितले. भक्तीच्या आई-वडिलांनी तिला आपल्या घरी देखील आणले. मात्र पुन्हा तिचा पती भक्तीच्या आई-वडिलांकडे जाऊन मी तिला त्रास देणार नाही, असे सांगून तिला सासरी घेऊन आला. मुलीचा संसार उद्ध्वस्त होऊ नये यासाठी भक्तीच्या घरच्यांनी देखील तिला सर्व विसरून पुन्हा सासरी पाठवले. मात्र भक्तीला पुन्हा तिचा पती दारू पिऊन मारहाण करू लागला. तसेच तिच्या सासू-सासऱ्यांकडून देखील भक्तीला वारंवार दिला जात होता. हा त्रास सहन न झाल्याने तिने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची तक्रार भक्तीच्या आई वडिलांनी गंगापूर पोलिसात दिली. यानंतर मृत भक्ती गुजरातीचा पती आणि सासरा फरार झाला होता. भक्तीच्या सासरच्या लोकांना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी भक्तीच्या आई वडिलांकडून करण्यात आली होती. याप्रकरणी कालच भाजप आमदार चित्रा वाघ यांनी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची भेट घेतली होती. यानंतर आता पती अथर्व गुजराथी आणि सासरा योगेश गुजराथी या दोघांना गुजरातच्या नवसारीतून नाशिक पोलिसांनी अटक केली आहे. आता चौकशीत नेमकी काय माहिती समोर येणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.