गोळीबाराच्या घटनेनं पुणे हादरलं! गप्पा मारत बसलेल्या तरुणांवर गुन्हेगारी इतिहास असलेल्या तरुणाचा गोळीबार
योगेश पांडे / वार्ताहर
पुणे – पुणे शहरातील मंगळवार पेठ भागातील भीमनगर कमानीजवळ रविवारी पहाटे गोळीबाराची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी रोहित माने (३२) या सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी घटनास्थळावरून अटक केली आहे. त्याचा साथीदार कासीम अन्सारी यालाही ताब्यात घेण्यात आले आहे. दोघांकडून एक पिस्तूल आणि काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे पाचच्या सुमारास किरण केदारी, शाम गायकवाड, अश्पाक शेख आणि संतोष कांबळे हे चौघेजण मंगळवार पेठेतील भीमनगर कमानीजवळ गप्पा मारत उभे होते. त्याचवेळी आरोपी दुचाकीवरून त्या परिसरात ये-जा करत होते. त्यांना हटकल्याचा राग आरोपींना आला. त्यातून त्यांनी या चौघांच्या दिशेने गोळीबार केला. सुदैवाने या गोळीबारात कुणालाही गोळी लागली नाही. घटनेची माहिती मिळताच फरासखाना पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही आरोपींना अटक केली.
गोळीबाराची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने कारवाई करत रोहित मानेला जागीच पकडले. तर काही वेळातच त्याचा साथीदार कासीम अन्सारी याच्याही मुसक्या आवळल्या. पोलिसांनी दोघांकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि काही काडतुसे हस्तगत केली आहेत. रोहित माने हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्याच्यावर यापूर्वीही आर्म्स ॲक्ट, खुनाचा प्रयत्न आणि मारहाण यांसारख्या गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. सध्या गुन्हे शाखा आणि फरासखाना पोलिस ठाण्याचे अधिकारी या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे मंगळवार पेठ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुढील तपास सुरू आहे.