विवाहित मित्राचा एक्स मैत्रिणीने भावाच्या मदतीने काढला काटा

Spread the love

विवाहित मित्राचा एक्स मैत्रिणीने भावाच्या मदतीने काढला काटा

योगेश पांडे / वार्ताहर 

नाशिक – विवाहाच्या वर्षपूतीनिमित्त तरुणाने पत्नीसोबत ठेवलेल्या प्रोफाइल पिक्चर मुळे मैत्रीण भडकली. त्यामुळे तिने भावासह नातलगांच्या मदतीने संबंधित तरुणाला मारहाण करीत त्याची हत्या केल्याचे उघड झाले आहे.नाशिक तालुका पोलिसांच्या हद्दीत विल्होळीत घडलेल्या हत्येप्रकरणी नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने एका महिलेसह पुरुषाला अटक केली आहे. या दोन्ही संशयितांना नाशिक जिल्हा न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे. तालुका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि.१३ मे रोजी सकाळी विल्होळी शिवारातील जैन मंदिराजवळील मोकळ्या जागेत सुरज काशीनाथ घोरपडे (३९) याचा मृतदेह आढळला होता. या प्रकरणी सुरजच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला.तपासादरम्यान शहर पोलिस दलाच्या गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांनी संशयितांचा माग काढण्याची सूचना केली. त्यानुसार अंमलदार नितीन जगताप यांना मिळालेल्या माहितीनुसार त्र्यंबकेश्वरमध्ये सापळा रचून संशयित इंदू विजय साळवे हिच्यासह तिचा भाऊ शशिकांत उर्फ नाना रामदास गांगुर्डे (२७) या दोघांना अटक करून नाशिक तालुका पोलिसांच्या ताब्यात दिले.

सहाय्यक निरीक्षक हिरामण भोये, उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, अंमलदार महेश साळुंके, मुक्तार शेख यांच्या पथकाने ही कारवाई केली. दरम्यान, नाशिक तालुका पोलिसांनी दोन्ही संशयितांना बुधवारी दुपारी जिल्हा न्यायालयात हजर केल्यावर त्यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली. तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक सत्यजित आमले यांचे पथक तपास करीत आहे. मृत सुरज हा मोलमजुरी करून उदरनिर्वाह चालवायचा. चार वर्षापासून संशयित इंदू साळवे ही त्याच्या संपर्कात होती. दि. १० मे रोजी सुरज याने विवाहाच्या वर्षपूर्तीनिमित्त पत्नीसोबतचा फोटो व्हॉट्सअपवर अपलोड केला. त्यानंतर इंदूने त्याला फोन करून वाद घालण्यास सुरुवात केली.दि. ११ व १२ मे रोजी सुरज हा इंदूची समजूत काढण्यासाठी विल्होळी शिवारातील तिच्या घरी पोहोचला. त्यावेळी संशयितांनी सुरजसोबत वाद घालून त्याला घरातच मारहाण केली. त्याचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच त्यांनी मृतदेहाची विल्हेवाट लावली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon