शाळेच्या संचालकाचा अश्लील कृत्य करताना व्हिडिओ व्हायरल; पालकांनी थेट गाठले कोळशेवाडी पोलीस ठाणे
योगेश पांडे / वार्ताहर
कल्याण – कल्याण पूर्व भागातील एका नामांकित खाजगी शाळेतील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शाळेच्या संचालकाचा एक अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकारामुळे शाळेतील विद्यार्थ्यांचे पालक प्रचंड संतप्त झाले आहेत. शाळेच्या कार्यालयातच संचालक अश्लील कृत्य करत असताना व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक पालकांनी थेट कोलशेवाडी पोलीस ठाणे गाठले. संबंधित संचालकाच्या विरोधात तक्रार अर्ज दाखल करण्यात आला असून त्याची चौकशी सुरू केली. याबाबत शाळेचे संचालक सदस्य महेश गायकवाड यांनी सांगितले, की संबंधितांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा, यासाठी मी देखील अनेकदा तक्रारी केल्या आहेत.
शाळा ही विद्यार्थ्यांच्या शिक्षण आणि संस्काराचे ठिकाण असते, आणि अशा ठिकाणी अश्लीलता समोर येणे ही अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे, अशी भावना पालकांनी व्यक्त केली आहे. या संपूर्ण प्रकरणात ठाकरे गटाने देखील आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसत आहे. ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी आशा रसाळ यांनी शाळा प्रशासनाच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच शिक्षण मंडळाकडेही तक्रार करून कारवाईची मागणी करू असे सांगितले आहे. दरम्यान या प्रकरणी कोलशेवाडी पोलिसांनी चौकशी करून कारवाई करण्यात येईल असे सांगितले.