दुबईतून शिर्डीत आलं गोल्डन नेम ॐ साई; साईबाबांच्या चरणी सोन्याचं भरभरुन दान
योगेश पांडे / वार्ताहर
शिर्डी – जगभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या देवस्थानांपैकी एक म्हणजे शिर्डीतील साईबाबा. शिर्डी साईबाबाच्या चरणी नतमस्तक होण्यास जगभरातून भाविक येतात.नववर्षाच्या सुरुवातीला शिर्डीतील साई मंदिरात भाविकांची मोठी गर्दी असते, त्यातच भक्तांकडून साईचरणी भरभरुन दानही दिलं जातं. रोख, मौल्यवान दागिने आणि ऑनलाईन पद्धतीनेही दान टाकलं जातं. साईबाबांच्या प्रती आपली श्रद्धा व्यक्त करण्यासाठी भाविक साईबाबांना भरभरून दान देत असतात. सोमवारी दुबई येथील एका साईभक्ताने तब्बल २७० ग्रॅम वजनाचे, आकर्षक नक्षीकाम असलेले सोन्याचे नाव अर्पण केलं आहे.सुवर्णातील “ॐ साई” हे नाव साईबाबांच्या चरणी अर्पण करण्यात आलं आहे. या सुवर्ण दानाची किंमत बाजारभावाप्रमाणे साडे चोवीस लाख रुपये असल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली.
देणगीदार भाविकाने सदर सुवर्ण “ॐ साई” हे नाव संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्याकडे नाव गुपित ठेवण्याच्या अटीवर सुपुर्द केल्याचे त्यांनी सांगितले.मंदिर परिसरातील द्वारकामाई येथील भिंतीवर ते बसविण्यात आले असून दुबई येथील भाविकाने हे दान दिले आहे.आपले नाव जाहीर न करण्याची विनंती सदर भाविकाने साईबाबा संस्थानला केलीय. यावेळी संस्थानच्या वतीने देणगीदार साईभक्तांचा सत्कार करण्यात आला. दरम्यान, साई मंदिर चरणी वर्षभरात कोट्यवधींचे दान प्राप्त होते, त्यात नववर्षाच्या सुरुवातीला मोठ्या प्रमाणात भाविक आपल्या मनातील इच्छापूर्ती बोलत दान अर्पण करत असतात.