बीडमध्ये ईडीची एन्ट्री, १८८ कोटींची मालमत्ता जप्त, कुटे ग्रुपचं कंबरडं मोडलं !
योगेश पांडे / वार्ताहर
बीड: बीड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात ज्ञानराधा मल्टिस्टेट कॉ-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीतील २,४६७ कोटी रुपयांच्या गुंतवणूक फसवणुकीप्रकरणी ईडी अर्थात सक्त वसुली संचलनालयाने १८८ कोटी ४१ लाख रुपये किमतीच्या मालमत्तांवर टाच आणली. आतापर्यंत टाच आणलेल्या मालमत्तांमध्ये कुटे ग्रुपच्या कंपन्यांशी संबधित जमीन, इमारत, प्लांट, यंत्र आदींचा समावेश आहे. या मालमत्ता बीड जिल्ह्यात असल्यााची माहिती ईडीकडून देण्यात आली. आतापर्यंत १६२१ कोटी ८९ लाख रुपयांच्या मालत्तेवर टाच आणण्यात आल्याची माहिती ईडीने दिली आहे. ईडीच्या तपासानुसार, आरोपी सुरेश कुटे आणि संबंधितांनी ज्ञानराधा मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची फसवणूक करण्यासाठी अनेक गुंतवणूक योजना राबविण्यात आल्या. गेल्यावर्षी मे ते जुलै महिन्यात कुटे व इतर आरोपींविरोधात फसवणूक व महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसुरक्षा कायद्याच्या (एमपीआयडी) कलमांखाली नऊ गुन्हे दाखल झाले होते. सहकारी संस्थेच्या माध्यमातून गुंतवणुकीच्या स्वरूपात २,४६७ कोटी रुपये स्वीकारून फसवणूक करण्यात आल्याचा आरोप आहे. त्या प्रकरणावरून ईडी याप्रकरणी तपास करीत आहे.
सुरेश कुटे आणि इतरांनी कट रचून २,४६७ कोटींची रक्कम ‘द कुटे ग्रुप’च्या विविध कंपन्यांना कर्जाच्या स्वरूपात अवैध आणि फसवणूक करून इतरत्र वळवली. ईडीने याप्रकरणी विविध मालमत्तांची माहिती घेऊन याप्रकरणात आतापर्यंत चार वेळा विविध मालमत्तांवर टाच आणली आहे. याप्रकरणात आतापर्यंत १६२१ कोटी ८९ लाख रुपयांच्या मालत्तेवर टाच आणण्यात आल्याची माहिती ईडीकडून देण्यात आली. ज्ञानराधा मल्टिस्टेट कॉ-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी ही एक सहकारी पतसंस्था आहे, जी महाराष्ट्र आणि इतर राज्यांमध्ये कार्यरत होती. या संस्थेने कथितपणे ४ लाख गुंतवणूकदारांकडून ठेवी स्वीकारल्या आणि नंतर फसवणूक करून ती सुरेश कुटे आणि त्यांच्या पत्नीच्या मालकीच्या कंपन्यांकडे वळवली, असे ईडीने म्हटले आहे. या प्रकरणी, ईडीने सुरेश कुटे आणि इतरांविरुद्ध पीएमएलए कायद्यांतर्गत कारवाई केली आहे.