पुण्यात भररस्त्यात तरुणीला संपवलं, शेजारचाच निघाला मुख्य आरोपी; पोलिसांनी २४ तासात आरोपींना ठोकल्या बेड्या
योगेश पांडे / वार्ताहर
पिंपरी चिंचवड – शहरातील वाल्हेकरवाडी परिसरात रविवारी रात्री १८ वर्षीय तरुणीची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली. कोमल भरत जाधव (१८) असे मृत तरुणीचे नाव असून, तिच्यावर दोघा अज्ञात व्यक्तींनी रस्त्यातच सपासप वार करून खून केला. या घटनेचा गांभीर्याने तपास करत पोलिसांनी २४ तासात खून करणाऱ्या आरोपींना जेरबंद केलं आहे. आता पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोमल जाधव ही पिंपरी चिंचवड शहरालगत असलेल्या वाल्हेकरवाडीमधील कृष्णाईनगर परिसरात आपल्या कुटुंबासोबत राहत होती. घटनेच्या वेळी मयत कोमल आपल्या घरात होती. यावेळी बाईकवरून आलेल्या दोन आरोपींनी तिला घराबाहेर बोलवून घेतलं. कोमल घराच्या खाली असता आरोपींनी तिच्यावर निर्दयीपणे वार केले. या हल्ल्यात तिचा मृत्यू झाला. यानंतर शहर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरु केला.
पोलिसांनी २४ तासांच्या आत आरोपींना जेरबंद केले आहे. उत्तर प्रदेशाचा रहिवासी असलेल्या ४५ वर्षीय मुख्य आरोपी उदयभान यादव आणि त्याच्या सख्या भाच्याला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत तरुणी आणि आरोपी हे शेजारी राहत होते. दोघांमध्ये संबंध आणि आर्थिक व्यवहार देखील झाले होते. याच संबंधातून निर्माण झालेल्या वादामुळे आरोपींनी कट रचून कोमलची हत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.