कल्याणमध्ये १ हजार रुपयांसाठी रुग्णावाहिका नाकारल्याने महिला दगावली; २ लेकर अनाथ
योगेश पांडे / वार्ताहर
कल्याण – कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी परिसरात राहणाऱ्या एका महिलेचा कल्याण डोंबिवली महापालिका रुग्णालयात पाच तास ॲम्बुलन्स न मिळाल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कल्याण पूर्वेत राहणाऱ्या सविता बिराजदार ३५ वर्षीय महिलेच्या शरीराची एक बाजू सुन्न झाल्याने केडीएमसीच्या बाई रुख्मिनी बाई रुग्णालयात सोमवारी दुपारी उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने रूग्णाच्या नातेवाईकांना कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला देण्यात आला. मयत सविता यांच्या नातेवाईकांनी कळवा येथे घेऊन जाण्यासाठी तयारी केली. मात्र, रुग्णाला घेऊन जाण्यासाठी ॲम्बुलन्स नसल्याने पाच तास रुग्णालयात ऍम्ब्युलन्सची वाट पाहावी लागली, यादरम्यान सविता यांचा मृत्यू झाला. सविता यांच्या नातेवाईकांनी ॲम्बुलन्स वेळेला मिळाली नसल्याने मृत्यू झाल्याने जबाबदार असलेल्या रुग्णालयातील डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.धक्कादायक बाब म्हणजे रुग्णाला घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिनीचे रुग्णालयकडून चार्जेस आकारण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. मयत सविता बिराजदार यांच्या नातेवाईकांकडे १००० रुपये नसल्याने त्यांनी ॲम्बुलन्स नाकारली, डॉक्टरांनी मयत सविता यांच्या नातेवाईकांना सल्ला दिला १०८ ॲम्बुलन्सला कॉल करा. त्यानंतर, नातेवाईकांनी १०८ ॲम्बुलन्सला कॉल केला, मात्र ॲम्बुलन्स उपलब्ध झाली नाही. धक्कादायक बाब म्हणजे रुग्णालयाच्याबाहेर १०८ क्रमांकाची ॲम्बुलन्स उभी आहे, त्या ॲम्बुलन्समध्ये ड्रायव्हर, डॉक्टर उपलब्ध नाहीत.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडे एकूण ४ ॲम्बुलन्स उपलब्ध आहेत. मात्र, चालक उपलब्ध नसल्याने ॲम्बुलन्स रुग्णालयाबाहेर उभ्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे एका रुग्णवाहिकेच्या चालकाने रुग्णाला घेऊन जाण्यासाठी दोन-तीन पेशंट आले तर जाऊ असे नातेवाईकांना सांगितले. त्यानंतर ॲम्बुलन्समध्ये ठेवण्यात आलेल्या सविता यांची प्रकृती खालवली, पुन्हा त्यांना रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी यांनी दिली आहे. जोपर्यंत रुक्मिणीबाई रुग्णालयातील जबाबदार रुग्णालय प्रशासनावर कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्र नातेवाईकांनी घेतला आहे. सविता बिराजदार यांची घरची परिस्थिती अत्यंत बिकट असून त्या घरातल्या कर्त्या असल्याने घरातील मुलगा आणि मुलगी अनाथ झाल्याने कल्याण पूर्व येथील कोळशेवाडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे