फरार नक्षलवाद्यांना मदत करणाऱ्या युवकाला एटीएस ने अखेर रायगडच्या जंगलातून ठोकल्या बेड्या
योगेश पांडे / वार्ताहर
रायगड – महाराष्ट्र दहशतवादविरोधीत पथकाने रविवारी एका ४४ वर्षीय व्यक्तीला बेड्या ठोकल्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या कथित आरोपांखाली त्याला अटक करण्यात आली आहे. प्रशांत जालिंदर कांबळे असं या व्यक्तीचं नाव असून, त्याला लॅपटॉप या नावानेही ओळखलं जातं. शहर नक्षलवाद प्रकरणी २०११ पासून तो वाँटेड होता असं अधिकारी म्हणाला आहे. दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत मारले गेलेले सीपीआयचे (माओवादी) वरिष्ठ नेते मिलिंद तेलतुंबडे आणि टॉप माओवादी अँजेला सोनटक्के यांचंही २०११ च्या एफआयआरमध्ये नाव होतं.एटीएस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत कांबळे रायगड जिल्ह्यातील खोपोली परिसरात लपून राहिला होता. तिथे तो गेल्या सहा ते सात वर्षांपासून आदिवासी विद्यार्थ्यांना शिकवत होता.
अधिकाऱ्याने सांगितलं आहे की, पुण्यातील ताडीवाला रोड येथे स्थित असणारा प्रशांत कांबळे कॉम्प्युटर आणि लॅपटॉप रिपेअरिंगचं काम करत होता. तिथे ते तो कबीर कला मंच या सांस्कृतिक गटाच्या संपर्कात आला. या गटावर नक्षलवादाशी संबंध असल्याचा आरोप आहे. पुढे त्यांनी सांगितलं की, प्रशांत कांबळेने २०१० मध्ये आपलं घर सोडलं होतं. आपण मुंबईला कामासाठी जात असल्याचं सांगून तो घरातून गेला होता. पण तो घरी परतलाच नाही. प्रशांत कांबळेसह पुण्यातून बेपत्ता झालेला संतोष शेलार गडचिरोलीच्या जंगलात सीपीआयचे (माओवादी) सक्रीय सदस्य होते.
जानेवारी २०२४ मध्ये संतोष शेलार आपल्या पुण्याच्या घऱी परतला होता. यादरम्यान त्याची प्रकृती बिघडलेली होती. एटीएसने तिथेच त्याला अटक केली. अधिकाऱ्याने सांगितलं की, प्रशांत कांबळे हे मोठं टार्गेट होतं. नक्षलवादी विचारसरणीचा कट्टर अनुयायी होता. २०११ च्या खटल्यानंतर, प्रशांत कांबळेला न्यायालयाने फरार घोषित केलं आणि त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट आणि घोषणापत्र जारी करण्यात आले, असे ते म्हणाले. एटीएसच्या पुणे युनिटने खोपोली येथून प्रशांत कांबळेला अटक केल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली आहे. पडताळणीनंतर त्याला अटक करण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. कांबळेला मुंबई न्यायालयात हजर करण्यात आलं असता त्याला १३ मेपर्यंत एटीएसच्या कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आल्याचं अधिकाऱ्याने सांगितलं आहे.