पुलवामा आणि आता पहलगाम, नेमके हल्ल्याच्या वेळीच मोदीजी देशाबाहेर कसे असतात? – सुषमा अंधारे
ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांचा पहलगाम हल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – भारताचं नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पहलगाम परिसरातील बैसरणा व्हॅली येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला. या हल्ल्यामध्ये २६ निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या भ्याड हल्ल्याचा जगभरातून निषेध व्यक्त केला जात आहे. जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद संपला असं वाटत होतं, त्यामुळे पर्यटकांची संख्या नंदनवनाकडे जाण्यासाठी वाढू लागली होती. पहलगाम येथे झालेल्या हल्लाने देशभरात खळबळ उडाली आहे. अमरनाथ यात्रेपु्र्वी हा हल्ला झाल्याने आता भक्तांमध्येही भीतीचे वातावरण पसरले आहे. या हल्ल्यानंतर विरोधी पक्षांनी केंद्र सरकारसोबत असल्याचं म्हटलं आहे. या हल्ल्याचा बदला घ्या अशी मागणीही केली जातेय. मात्र अशातच ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौऱ्यावर असताना कसा काय हल्ला होतो असा सवाल केला आहे. मोदी फोनवरून कसे संपर्कात, अमित शहा कसे पोहोचले हे पुन्हापुन्हा रिवाइंड करून दाखवण्यापेक्षा, तिथे सुरक्षितता का नव्हती? आतंकवादी एवढ्या आत पोहोचेपर्यंत सुरक्षामंत्रालय काय करत होतं? पुलवामा आणि आता पहलगाम, नेमके हल्ल्याच्या वेळीच मोदीजी देशाबाहेर कसे असतात? हेही प्रश्न विचारा ना? असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे. सुषमा अंधारेंनी आपल्या एक्स अकाऊंटवर पोस्ट केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे परदेश दौऱ्यावर होते, मंगळवारी २२ एप्रिलला हा हल्ला झाला होता. तेव्हा मोदी सौदी अरेबियलामध्ये होते. हल्ल्याची माहिती समजताच ते माघारी परतले आहेत. याच मुद्द्यावरून सुषमा अंधारे यांनी थेट पंतप्रधानांवर निशाणा साधला आहे. पुलवामा हल्ल्याचा उल्लेख करत नरेंद्र मोदी आताही पहलगाममध्ये हल्ला झाल्यावर परदेशात कसे असेही प्रश्न विचारा असं सुषमा अंधारेंचं म्हणणं आहे. दरम्यान, सौदी अरेबिया आणि यथील भारतीय समुदायाच्या वतीने त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. उभय देशांतील संबंध वृद्धिंगत करण्यासाठी युवराज महंमद बिन सलमान यांच्याशी मोदी चर्चा करणार होते. मात्र, रात्री झालेल्या घडामोडींनंतर मोदी भारतात परतले.