देशी पिस्तुल आणि काडतुसांसह आरोपीला बेड्या; कल्याण गुन्हे शाखेची कारवाई
पोलीस महानगर नेटवर्क
कल्याण – कल्याणच्या नेतीवली परिसरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. कल्याण गुन्हे शाखा, घटक ३ युनिटच्या पथकाने एक मोठी कारवाई करत विनापरवाना गावठी पिस्तुल आणि जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या बिंदास म्हात्रे (३६) याला अटक केली आहे. मिथुन राठोड या पोलीस शिपायाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याण पूर्वेतील कोळशेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नेतीवली चक्कीनाका परिसरात एक इसम बेकायदेशीर शस्त्रसाठा बाळगून असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचण्यात आला. त्यानुसार पोलिसांनी बिंदास म्हात्रे याला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्या राहत्या घराची झडती घेतली असता, त्याच्याकडून एक गावठी पिस्तुल, मॅगझिन, दोन जिवंत काडतुसे आणि एक रिकाम्या काडतुसाची पुंगळी असा एकूण ६२ हजार रुपयांचा शस्त्रसाठा हस्तगत करण्यात आला. या प्रकरणी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीने हे पिस्तुल कुठून आणले व यामागील उद्देश काय होता, याचा तपास कोळशेवाडी पोलीस करत आहेत.