सोलापूरात ढाब्यांवर मद्यपान करणाऱयांना होईल अटक; राज्य उत्पादन शुल्क विभागाची २७७ ढाबे-हॉटेलवर कारवाई
पोलीस महानगर नेटवर्क
सोलापूर – मद्यपान सर्वांचा आवडीचा विषय, पण ढाब्यावर मद्यपान करणाऱ्याना चांगलाच चाप लागणार असल्याचे बोलले जात आहे. सोलापूरात अशीच कारवाई करण्यात आली. मद्यपानासाठी एक दिवसीय, एक वर्षासाठी व आजीवन परवाना दिला जातो. परवान्याशिवाय दारू खरेदी व मद्यपान करणाऱ्यांवर कारवाई होते. याशिवाय ढाबे-हॉटेलवर मद्यविक्री किंवा मद्यपान करणाऱ्यांना अटक करून त्यांना न्यायालयात हजर केले जाते. त्याठिकाणी मद्यपीसह एक ते तीन हजारापर्यंत तर ढाबा-हॉटेल चालक किंवा मालकास पाच ते ३० हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. त्या उत्पादन शुल्क विभागाने २०२४-२५ या वर्षात २७७ ढाब्यांवर कारवाई केली आहे.
सोलापूर जिल्ह्यात गोवा, कर्नाटकातून विदेशी दारूची अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणावर होते. याशिवाय हॉटेल-ढाब्यांवर विशेषत: महामार्गांवरील हॉटेल-ढाब्यांवर बिनधास्तपणे मद्यविक्री होते आणि हजारो वाहन चालक त्याठिकाणी मद्यपान करतात. परमीट रुमशिवाय अन्य ठिकाणच्या मद्यपानास बंदी असून बिअरशॉपी, वाइन शॉपमधूनच मद्यविक्री अपेक्षित आहे. अनेक हॉटेल-ढाबा चालक तेथून दारू आणतात आणि हॉटेलवर जेवायला आलेल्यांची मद्यपानाची सोय करून देतात. या पार्श्वभूमीवर गतवर्षीच्या तुलनेत ‘राज्य उत्पादन शुल्क’ विभागाची ढाब्यांवरील कारवाई वाढल्याची दिसून येते.
विनापरवाना मद्यपान केल्यास कारवाई
एप्रिल २०२४ ते मार्च २०२५ या काळात ढाबे, हॉटेलवर अवैध मद्यपान करणाऱ्या मद्यपींसह परवानगी नसताना मद्य विक्री करणारे हॉटेल-ढाबा मालक, अशा २७७ जणांवर कारवाई केली आहे. त्यांना न्यायालयाने एकूण दहा लाखांहून अधिक रुपयांचा दंड ठोठावला आहे. परमीट रुमशिवाय कोणत्याही ठिकाणी विनापरवाना मद्यपान करता येत नाही, तसे आढळल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल होऊन कारवाई होऊ शकते.
– भाग्यश्री जाधव, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, सोलापूर