दुकानदाराच्या सजगतेने बनावट सोन्याची विक्री करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला पोलिसांकडून बेड्या

Spread the love

दुकानदाराच्या सजगतेने बनावट सोन्याची विक्री करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला पोलिसांकडून बेड्या

योगेश पांडे / वार्ताहर 

चंद्रपूर – बनावटी सोन्याला खरे सोने असल्याचे भासवून सराफा व्यापाऱ्यांना लुटण्याचे प्रकार अलीकडे सर्रास वाढल्याने खबरदारी म्हणून पोलिसांनी सराफा व्यापाऱ्यांना सावध केले. आणि अशातच काही भामट्यांनी एका सराफा व्यापाराच्या दुकानात जावून त्याला गंडा घालण्याचा प्रयत्न केला. परंतु सराफा व्यापाऱ्याच्या प्रसंगावधानामुळे मोठा प्रसंग होता होता राहिला. एका महिलेसह तीन इसम सोन्याचे मणी दाखवून जवळपास एक किलोची सोन्याची माळ २० लाखांना विक्री करण्यासाठी सराफा दुकानात पोहचले. दुकानदाराला संशय आला. त्याने पोलिसांना माहिती दिली. दुकानदाराच्या सजगतेने बनावट सोन्याची विक्री करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले. पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. आरोपींकडून तब्बल १ किलो ३६१ ग्रॅम नकली पिवळ्या धातुची बनावटी मण्यांची माळ, १.५ मिली ग्रॅमाचे सोन्याचे चार मणी जप्त केले आहेत.

प्राप्त माहितीनुसार, चंद्रपुरात बनावट सोन्याची विक्री करणारी टोळी सक्रिय असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे पोलिसांनी सराफा व्यावसायिकांना सतर्क केले होते. अशातच छोटा बाजार परिसरातील जया कलेक्शन या दुकानाचे मालक राकेश मंधानी यांनी पोलिसांना, त्यांच्याकडे एका महिलेसह तीन इसम सोन्याचे मणी दाखवून जवळपास एक किलोची सोन्याची माळ विस लाख रुपयांना विक्री करण्यासाठी आल्याचे सांगितले.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून चौघांना अटक केली. त्यांच्याकडून तब्बल एक किलो ३६१ ग्रॅम नकली पिवळ्या धातुची बनावटी मण्यांची माळ, १.५ मिली ग्रॅमाचे सोन्याचे चार मणी जप्त केले आहेत. अतुल उर्फ मुखी बनाराम परमार, शत्रुघ्न सीताराम सोलंकी, पुरन प्रेमचंद बघेल, लक्ष्मी सेवाराम राठोड अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. ही कारवाई पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलिस अधीक्षक रिना जनबंधू यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सपोनि दीपक कांक्रेडवार, पोउपनि सुनिल गोरकार, किशोर वैरागडे, दीपक डोंगरे, सतीश अवथरे, रजनीकांत पुठ्ठवार यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon