पुण्यात बनावट कंपन्या स्थापन करुन २ कोटी ६६ लाखांची फसवणुक करणार्या तिघांना वानवडी पोलिसांकडून जेरबंद
११० ग्राहकांची फसवणूक, सात जणांवर गुन्हा दाखल
पोलीस महानगर नेटवर्क
पुणे -पुणे तिथे काय उणे अशी म्हण प्रचलित आहे. पुण्यात सध्या गुन्हेगारी, महिलांवर अत्याचार, फसवणूक, अशा घटना सातत्याने घडत आहेत. अशीच एक फसवणूकीची घटना घडली आहे. घन कचरा व्यवस्थापनाशी निगडीत विविध बनावट कंपन्या स्थापन करुन त्यामध्ये गुंतवणूक करायला लावले. तसेच भाडे तत्वावर वाहने घेऊ, असे सांगून लोकांना कार, दुचाकी, जे सी बी अशी वाहने खरेदी करण्यास भाग पाडले. ही वाहने भाडेतत्वावर घेऊन ती परस्पर विकून टाकल्याचा प्रकार समोर आला आहे. जवळपास ११० लोकांची २ कोटी ६६ लाख ९५ हजार ३०२ रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी ७ जणांवर गुन्हा दाखल केला असून एकाला अटक केली आहे.
याबाबत ज्ञानेश खंडु शिंदे (वय २४, रा. अवसरी बु़ ता. आंबेगाव) यांनी वानवडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी संकेत सुधीर थोरात (वय ३०, रा. हांडेवाडी), सोनु नवनाथ हिंगे (वय २९), रिजवान फारुख मेमन (वय ४४, रा. गणेश पेठ) यांना अटक केली आहे. प्रणय उदय खरे (वय ३२), वृषाली संतोष रायसोनी (वय २४, रा. बिबवेवाडी), विजय चंद्रकांत आशर (वय ६५, रा. ईस्कॉन मंदिराजवळ, टिळेकरनगर, कोंढवा) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार वानवडीतील जगताप चौक येथील सेक्रेड वर्ल्ड इमारतीमधील शॉपमध्ये ऑक्टोंबर २०२४ पासून आतापर्यंत घडला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या परिचयाचे सोनु हिंगे यांनी त्यांना सांगितले की, तो बायो फिक्स प्रो कंपनीचा व्हेंडर आहे. कंपनी घन कचरा व्यवस्थापनाचे काम करते. कंपनीत जे सी बीची आवश्यकता आहे. तसेच कंपनी जे सी बी भाडेतत्वावर घ्यावयास इच्छुक आहे. कंपनीमध्ये जे सी बी वापरण्यास दिले नंतर भाड्यापोटी कंपनी दरमहा १ लाख ३० हजार रुपये भाडे देणार आहे. त्या व्यतिरिक्त जीएसटीही कंपनीच ७ वर्षे भरणार आहे. ही स्किम चांगली वाटल्याने त्यांनी १४ डिसेबर २०२४ रोजी ३९ लाख रुपयांना जे सी बी खरेदी केला. दुसर्या दिवशी तो बायोफिक्स प्रो कंपनीस भाडेतत्वावर वापरण्यास दिला. त्यांना भाडेपोटी जानेवारी २०२५ मध्ये ६० हजार रुपये देण्यात आले.
त्यांना उर्वरित रक्कम देण्यात आली नाही. त्यांचे जे सी बी कोठे आहे, हे ही सांगत नव्हते. त्यांचे जे सी बी उंड्री येथील गोदामात दिसून आले. त्यांनी रिजवान मेमन यांना विचारणा केली असता त्यांनी दर्पण ठक्कर यांच्या मध्यस्थीने अनेक जेसीबी, पॉकलॅन्ड खरेदी केल्याचे सांगितले. अधिक चौकशी केल्यावर या आरोपींनी बायोपिक्स प्रो ग्लोबल मुफेडको, म्युफ्याको कंपनी व भारत इंडस्ट्रिज कंपनी यामध्ये गुंतवणूकदारांना चांगले भाडे देण्याचे आमिष दाखवून त्यांना गाड्या खरेदी करण्यास भाग पाडून भाड्यापोटी ठरलेली रक्कम न देता त्यातील काही गाड्यांचा परस्पर अपहार केला. काही गाड्यांचे स्पेअर पार्ट बाजारामध्ये भंगारात विक्री केली आहे. काही गाड्या मिळूनच येत नाहीत. असे जवळपास १५० पेक्षा जास्त गुंतवणुकदार आहेत. या सर्वांनी वानवडी पोलीस ठाण्यात सामाईकरित्या तक्रार अर्ज दिला. त्यात अनेकांना कार, छोटा हत्ती, टेम्पो, जेसीबी, ऑरगॅनिक वेस्ट कम्पोस्टर मशीन अशा वस्तू खरेदी करायला लावल्या. सोनु हिंगे व संकेत थोरात त्यांच्या सांगण्यानुसार ही वाहने कंपनीकडे भाडेतत्वावर वापरण्यास दिली. त्याचे भाडे दिले नाहीच उलट ही वाहनांची परस्पर विल्हेवाट लावून जवळपास २ कोटी ६६ लाख ९५ हजार ३०२ रुपयांची फसवणूक केल्याच्या तक्रारी वानवडी पोलिसांकडे आतापर्यंत मिळाल्या आहेत. पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. पोलीस निरीक्षक (गुन्हे) गोविंद जाधव तपास करीत आहेत.