काळी बाहुली, रांगेत मांडलेले लिंबू अन् हळदी-कुंकवाचा सडा; मुंबई उच्च न्यायालयासमोरच काळ्या जादूचा प्रकार
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – महाराष्ट्र, म्हणजे पुरोगामी राज्य हे अगदी परवलीचं वाक्य झालंय..पण खरंच महाराष्ट्र पुरागोमी आहे का..असं विचारायचं कारण म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाच्या बाहेर अंधश्रद्धेचा प्रकार पाहायला मिळालाय. लिंबू, नारळ, काळ्या बाहुल्या, हळदी कुंकू हे पाहून खळबळ माजली. राज्यात कायदा करूनही अंधश्रद्धेचं भूत काही जात नाही, असंच चित्र पाहायला मिळालं. अस्ताव्यस्त पडलेले नारळ. रांगेत मांडेलेले लिंबू. सर्व गोष्टीवर केलेला हळद कुंकवाचा मारा आणि बाजूला पडलेले काळ्या बाहुल्या. हे चित्र कुठल्या गावखेड्यातील किंवा ओसाड माळारानावरचं नाही. तर राज्याच्या सर्वोच्च मुंबई उच्च न्यायालयाच्या गेट समोरचा आहे.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल इथे कुणी आणि कधी हा खेळ मांडलाय. याचं उत्तर सध्या तरी कुणाकडे नाहीय. पण या अंधश्रद्धेच्या या खेळामुळे उच्च न्यायालयाच्या परिसरात चांगलीच चर्चा रंगलीय. न्यायालयाच्या प्रवेश द्वाराजवळ हा अंधश्रद्धेचा खेळ मांडला असल्याने कामाच्या व्यापात घाईघाईने जाणाऱ्या सामान्य माणसं आणि वकील ही दचकताना दिसतायेत. तर यामुळे काहितरी होईल या भीतीने चार पाच तास हा उतारा उचलण्याचे धाडसही कुणी केलं नाही. राज्यात जादू टोणा विरोधी कायदा लागू आहे. पण या घटनेने कायद्याचा धाक किती राहिलाय असा प्रश्न उपस्थित होतोय. मुंबई उच्च न्यायालयाच्या बाजुला अघोरी विद्येचा प्रकार घडल्यान चांगलीच चर्चा रंगलीये. राज्यात २०१३ ला नरेंद्र दाभोलकर यांच्यामुळे जादू टोणा विरोधी कायदा आला. मात्र कायद्याची अमंलबजावणी किती होते हा सवालच आहे…त्यात आता मुंबई हायकोर्टाच्या बाजूला लिंबू, काळ्या बाहुल्या दिसल्याने अजूनही समाजात प्रबोधनाची गरज आहे असं वाटू लागलंय.