इंग्रजी भाषेतील कमानीला काळे फासत केईएम रुग्णालयासमोर शिवसेना ठाकरे गटाकडून आंदोलन

Spread the love

इंग्रजी भाषेतील कमानीला काळे फासत केईएम रुग्णालयासमोर शिवसेना ठाकरे गटाकडून आंदोलन

योगेश पांडे / वार्ताहर 

मुंबई – शिवसेना ठाकरे गटाकडून बुधवारी मुंबई महानगरपालिकेच्या केईएम रुग्णालयासमोर आंदोलन केले. रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराबाहेरील इंग्रजी भाषेतील कमान हटवावी या मागणीसाठी शिवडी विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकांनी आंदोलन केले. यावेळी शिवसैनिकांनी कमानीला काळे फासून निषेध व्यक्त केला. परळ येथील मुंबई महानगर पालिकेच्या राजे एडवर्ड स्मारक अर्थात केईएम रुग्णालयाल आणि सेठ गोवर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालय (जी. एस. मेडीकल कॉलेज) या वास्तूला नुकतीच शंभर वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने जानेवारी महिन्यात रुग्णालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच या कालावधीत रुग्णालयाच्या प्रवेशद्वार क्रमांक २ बाहेर एक तात्पुरती कमान उभारण्यात आली होती. या कमानीवर रुग्णालयाचे नाव इंग्रजी भाषेत लिहिण्यात आले होते. कार्यक्रम संपून दोन महिने झाले तरी ही इंग्रजी भाषेतील कमान न हटवल्यामुळे शिवसेना (ठाकरे) गटाचे आमदार अजय चौधरी यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी सकाळी आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसैनिकांनी घोषणाबाजी करीत कमानीवरील इंग्रजी अक्षरांना काळे फासले.

रुग्णालयाच्या शतकपूर्ती सोहळ्याच्या निमित्ताने सर्व प्रवेशद्वारांवर नवीन कमान उभारण्यात आली होती. त्यावर केईएम प्रशासनाने इंग्रजी आद्याक्षरे लिहिली होती. त्यामुळे मराठीचा अपमान केल्याची भावना सर्व जनतेमध्ये होती. हा कार्यक्रम १८ ते २२ जानेवारी दरम्यान होता. परदेशातील पाहुणे येणार आहेत असे सांगून इंग्रजीमध्ये रुग्णालयाचे नाव लिहिण्याचा केइम प्रशासनाचा हट्ट होता, परंतु कार्यक्रम संपूनही दोन महिने झाले तरी केईएम प्रशासनाने हे इंग्रजी फलक काढले नाहीत. त्यामुळे केईएम रुग्णालयाच्या प्रशासनाला निवेदनही देण्यात आलेले होते. तातडीने इंग्रजी अक्षरातील ही कमान काढा किंवा त्याचे मराठीकरण करा. त्याला एक महिना होऊन गेला तरी अद्याप प्रशासनाने कार्यवाही केलेली नाही. म्हणून शिवसेनेच्या वतीने आंदोलन करून कमानीला काळे फासण्यात आले, असे शिवडीमधील माजी नगरसेवक अनिल कोकीळ यांनी यावेळी सांगितले. शिवडी हा शिवसेना (ठाकरे) पक्षाचा बालेकिल्ला असून बुधवारी झालेल्या आंदोलनात पक्षाचे सर्व माजी नगरसेवक सहभागी झाले होते. यामध्ये माजी नगरसेवक अनिल कोकीळ, दत्ता पोंगडे, सिंधु मसुरकर, सचिन पडवळ, श्रद्धा जाधव, तसेच शाखाप्रमुख उपशाखाप्रमुख आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विशेषतः सामान्य नागरिक या आंदोलनात सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon