ईडी ने १० वर्षांत १९३ नेत्यांवर केली कारवाई; पण सापडले फक्त २, केंद्र सरकारनेच दिली माहिती
योगेश पांडे / वार्ताहर
नवी दिल्ली – ईडी अर्थात अंमलबजावणी संचालनालय (ईडी)चं नाव ऐकलं की चांगल्या चांगल्या नेत्यांना घाम फुटला. महाराष्ट्रामध्ये तर ईडीने कारवायाचा सपाटा लावला होता. शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादीतील काही नेत्यांनी ईडीच्या दारात जाऊन परत आले आहे. तर काही जणांची ईडीच्या पिड्यातून सुटकाही झाली आहे. बुधवारी केंद्र सरकारने ईडीच्या कारवायांबद्दल संसदेत महत्वाची माहिती दिली. सिपीआयएम चे राज्यसभा खासदार ए ए रहिम यांनी विचारलेल्या प्रश्नावर अर्थ मंत्रालयाने सविस्तर उत्तर दिलं आहे. केंद्रीय अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लेखी उत्तरात महत्त्वाची माहिती दिली असून यामध्ये मागील १० वर्षात केलेल्या कारवायांची वर्षनिहाय माहिती मंत्रालयाकडून स्पष्ट केली आहे. मागील १० वर्षात १९३ राजकीय नेत्यांच्या विरोधात ईडीनं गुन्हा नोंदवला पण त्यापैकी फक्त २ प्रकरणातील नेत्यांना ईडीकडून शिक्षा झाली आहे. गुणवत्तेच्या आधारावर एकाही प्रकरणात नेत्याची निर्दोष मुक्तता झाली नाही, असं या उत्तरामध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे.
२०१९ ते २०२४ या कालावधित गुन्हा दाखल करण्याच्या प्रमाणात वाढ झाली असून सर्वाधिक ३२ गुन्हे हे २०२३-२०२४ या वर्षात दाखल झाले होते. दरम्यान, सुप्रीम कोर्टानंही इडीच्या कारवाईबाबत अनेक वेळा नाराजी व्यक्त केली होती.