न्यू इंडिया को ऑपरेटीव्ह बँक घोटाळा प्रकरण ! भाजप नेत्याच्या भावाला अटक, २४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – न्यू इंडिया को ऑपरेटीव्ह सहकारी बँकेच्या १२२ कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेने जावेद आझम यांना अटक केली आहे. जावेद आझम हे भाजप नेता हैदर आझमचे भाऊ आहेत. जावेद यांना २४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडून बँक घोटाळ्यातील आझम हा अटक झालेला सतवा आरोपी आहे. व्यावसायिक उन्नथन अरुणाचलनच्या अटकेनंतर चौकशीत नाव समोर आल्यानंतर जावेद आझमला चौकशीला बोलवण्यात आलं होतं. चौकशीनंतर काल रात्री उशिरा मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं जावेदला अटक केली आहे. जावेद आझमचा इलेक्ट्रॉनिकचा व्यवसाय असून त्यासाठी उन्नथन अरुणाचलमने त्याला १८ कोटी दिल्याचा आरोप आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांनी न्यू इंडिया को-ऑप बँकेतील १२२ कोटींची रक्कम गहाळ झाल्याबाबत चौकशी केल्यानंतर १२ फेब्रुवारी रोजी सदर घोटाळा समोर आला होता. याप्रकरणी आतापर्यंत ७ जणांना ताब्यात घेण्यात आलेले आहे. न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँकेचे महाव्यवस्थापक आणि अकाऊंट विभागाचे प्रमुख हितेश मेहता, माजी सीईओ अभिमन्यू भोअन, बांधकाम व्यावसायिक धर्मेश पौन, मालाड येथील व्यापारी उन्नाथन अरूणाचलम आणि त्यांचे बंधू मनोहर अरुणाचलम आणि कंत्राटदार कपिल देढिया यांना अटक झालेली आहे. जावेद आझम हे भाजप नेता हैदर आझमचा भाऊ आहे. २०२२ साली हैदर आझम हे वादात अडकले होते. त्यांची पत्नी रेशमा या बांगलादेशी नागरिक असून त्यांनी पासपोर्ट बनविण्यासाठी बोगस कागदपत्रे सादर केल्याचा आरोप केला गेला होता. मात्र नंतर त्यांच्या पत्नीची या प्रकरणातून मुक्तता करण्यात आली. ३० पेक्षा जास्त शाखा असलेल्या आणि बहुराज्य सहकारी बँकेचा दर्जा मिळविलेल्या न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेवर रिझर्व्ह बँकेने निर्बंध लादण्यासह तिचे संचालक मंडळ बरखास्त करणारी कारवाई केली. तसेच या बँकेवर ‘प्रशासक’ नियुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे नवीन कर्जवाटपासह सहा महिन्यांसाठी ठेवी काढण्यावर बंदी घालण्याचा आदेश न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेला देण्यात आले. त्यामुळे या बँकेच्या ठेवीदार आणि ग्राहकांना मोठा धक्का बसला आहे.