फडणवीस सरकारचा आणखी एक मंत्री अडचणीत; माजी राष्ट्रपतींची जमीन हडपल्यानंतर शासनाचीही फसवणूक मंत्री रावलांवर अनिल गोटेंचा गंभीर आरोप
पोलीस महानगर नेटवर्क
धुळे – गेल्या काही दिवसांपूर्वी माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची जमीन थेट मंत्री असलेल्या जयकुमार रावल यांनी हडपली असल्याचा समोर आलं होतं. त्यानंतर आता त्यांचा आणखी एक प्रताप समोर आला आहे. त्यांनी मंत्री जयकुमार रावल यांनी शासनाची फसवणूक करून दोन कोटी ६५ लाख रुपये लाटले असा आरोप अनिल गोटे यांनी केला आहे.
नेमकं प्रकरण काय?
शिंदखेडा तालुक्यातील शेवाळे धरणामध्ये पाण्याच्या बुडाताखाली आपली जमीन जात असल्याचे भासवून खोटे अर्ज करून महाराष्ट्र शासनाकडून मंत्री जयकुमार रावल यांनी तब्बल २ कोटी ६५ लाख रुपये हडप केले असल्याचा गंभीर आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी आज जाहीर पत्रकार परिषदेमध्ये केला आहे.
जयकुमार रावल आणि त्यांच्या कुटुंबीयांनी आपल्या मालकीच्या शेत जमीन ही शेवाळे धरणात जाणार असल्याचे सांगून शासनाची फसवणूक केली आहे. मात्र असे धादांत खोटे अर्ज दाखल करून आपल्या आमदारकीचा गैरफायदा जयकुमार रावल यांनी घेतला आहे. तसेच सातत्याने सरकारी अधिकाऱ्यांवर खोटे आरोप करून तीन वेळा सदर जमिनीचा जॉइंट सर्व्हे करण्यासाठी तत्कालीन सरकारला आणि शासकीय कर्मचाऱ्यांना वेटीस धरून सदर कृत्य मंत्री जयकुमार रावल यांनी केल्याचे म्हणत माजी आमदार अनिल गोटे यांनी दोंडाईचा पोलीस ठाण्यामध्ये जयकुमार रावल आणि त्यांच्या परिवारावर तक्रार देखील दिली असल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषद मध्ये दिली.
अनिल गोटेंचा संतोष देशमुख करण्याची चर्चा
मंत्री जयकुमार रावल तसेच धुळे महानगरपालिका भ्रष्टाचार विरोधात अनिल गोटे हे सातत्याने आवाज उठवत आहे व वेगवेगळ्या प्रकारची माहिती मागत असल्याने भाजपच्या वरिष्ठ पातळीवर अनिल गोटे यांच्या संदर्भात गांभीर्याने चर्चा झाली असून मराठवाड्यातील बीड पॅटर्न प्रमाणे धुळ्यातील राजकीय विरोधक असलेले अनिल गोटे यांचा संतोष देशमुख सारखाच बंदोबस्त केला पाहिजे अशी चर्चा झाली असल्याचे आपल्याला पोलीस खात्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने खात्रीशीर माहिती दिली असल्याचे अनिल गोटे यांनी यावेळी सांगितले