होळीचा आनंद दुःखात बदलला; बदलापूरमध्ये चार विद्यार्थ्यांचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू
बदलापूर – बदलापूरमध्ये होळीचा सण जल्लोषात साजरा केल्यानंतर काही विद्यार्थ्यांनी आपले शरीर आणि कपडे रंगांनी माखले असल्यामुळे नदीत धुण्यासाठी जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यांचा हा निर्णय जीवघेणा ठरला. चमटोली गावाजवळील उल्हास नदीत चार विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ही दुर्घटना दुपारी साधारणतः २.३० वाजताच्या सुमारास घडली. पोद्दार हाऊसिंग कॉम्प्लेक्समध्ये राहणाऱ्या काही विद्यार्थ्यांचा गट होळी खेळल्यानंतर आपल्या अंगावरील रंग धुण्यासाठी जवळच्या उल्हास नदीकाठी गेला होता. त्यांनी या नदीच्या खोलीचा आणि प्रवाहाचा योग्य अंदाज घेतला नाही. आर्यन मेदार (१५), आर्यन सिंग (१६), सिद्धार्थ सिंग (१६) आणि ओम तोमर (१५) या चार मित्रांनी पाण्यात उतरल्यावर एकाला खोल पाण्यात ओढले गेले. त्याला वाचवण्यासाठी उर्वरित तिघांनी प्रयत्न केला, पण दुर्दैवाने ते स्वतःही प्रवाहाच्या तडाख्यात अडकले आणि बुडून गेले.
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि बचाव पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. अथक प्रयत्नांनंतर अधिकार्यांनी चौघांचेही मृतदेह पाण्यातून बाहेर काढले. मात्र, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. या दुःखद घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली असून त्यांच्या घरच्यांचे अश्रू थांबण्याचे नाव घेत नाहीत. या घटनेनंतर प्रशासनाने पालक आणि विद्यार्थ्यांना नदीच्या पाण्यात उतरताना अत्यंत काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच, ज्या ठिकाणी खोल पाणी आहे किंवा प्रवाह तीव्र आहे, अशा ठिकाणी जाण्याचे टाळावे, असा सल्ला दिला आहे. होळीचा सण हा आनंदाचा असतो, पण अविचाराने घेतलेले निर्णय कधी कधी जीवघेणे ठरू शकतात, हे या घटनेवरून स्पष्ट होते.