अहिल्यानगरमधील महालक्ष्मी मंदिरात सोने-चांदीच्या दागिन्यांची चोरी, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पोलीस महानगर नेटवर्क
अहिल्यानगर– येथील परिसरातून एक खळबळजनक घटना समोर येत आहे. संगमनेर तालुक्यातील काकडवाडी येथील श्री महालक्ष्मी मंदिरात ९ मार्च रोजी पहाटेच्या सुमारास मोठी चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. अज्ञात चोरट्यांनी मंदिराचा दरवाजा तोडून ५० ते ६० तोळे सोन्याच्या दागिन्यांसह दोन किलो वजनाचा चांदीचा मुखवटा लंपास केला. धक्कादायक बाब म्हणजे पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशानं चोरट्यांनी सीसीटीव्हीचा डीव्हीआरदेखील लंपास केला.
श्री महालक्ष्मी मंदिराचे पुजारी नियमित पूजा करण्यासाठी श्री महालक्ष्मी मंदिरात सकाळी आले असता चोरीचा प्रकार उघडकीस आला. यानंतर मंदिर प्रशासनानं तत्काळ पोलिसांना कळवले. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक कुणाल सोनवणे आणि तालुका पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक, ठसे तज्ज्ञ आणि श्वानपथकाची टीम तपासासाठी दाखल झाली आहे. पोलिसांच्या तपासानुसार चोरट्यांनी मध्यरात्री किंवा पहाटेच्या सुमारास मंदिरात प्रवेश करून चोरी केली. चोरी झालेल्या मुद्देमालाची किंमत सुमारे ५० लाख रुपये असल्याचा अंदाज आहे.
या प्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगवान केली आहेत. चोरट्यांनी पूर्वनियोजित केल्याचा कट-संगमनेर तालुक्यातील काकडवाडी येथील श्री महालक्ष्मी मंदिर हे हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. दरवर्षी येथे मोठ्या उत्साहाने यात्रा भरते. मात्र, या मोठ्या देवस्थानाच्या सुरक्षेवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. सीसीटीव्ही असूनही डीव्हीआर गायब केल्यानं चोरट्यांनी पूर्वनियोजित कट रचल्याचं स्पष्ट होत आहे. सीसीटीव्हीचा डीव्हीआर चोरट्यांनी सोबत नेल्यामुळे पोलीस देखील चक्रावून गेले आहेत. याप्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.